अल्पवयीन मुलांनी ओरबाडल्या पोती, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

nashik crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील म्हसरुळ व आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी करीत महिलांचे दागिने ओरबाडून नेणाऱ्या संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. दोघांकडून जबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून दोन्ही संशयित अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे.

म्हसरुळ व आडगाव परिसरात जबरी चोरीचे प्रकार सतत घडत होते. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने प्राप्त केले. दागिने ओरबाडणारे चोरटे लाल रंगाच्या व्हेस्पा दुचाकीवरून जात असल्याचे दिसते. पोलिस अंमलदार प्रशांत मरकड यांनी खबऱ्यांमार्फत चोरट्यांची ओळख पटवली. संशयित सिडको परिसरात राहत असल्याचे उघड झाल्याने पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रविण वाघमारे, नझीमखान पठाण, मरकड आदींच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. सखोल चौकशीत दाेघांनी दोन वाहनांचा वापर करीत मागील वर्षी सहा जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यात आडगाव व म्हसरुळच्या हद्दीत प्रत्येकी ३-३ गुन्हे संशयितांनी केले.

जबरी चोरी केल्यानंतर ओरबाडलेले दागिने संशयितांनी शिरीष गणपतराव शिरवाडकर (रा. सिडको) यास विक्री केल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संशयित शिरीष यास देखील आरोपी केले आहे. संशयितांकडून पोलिसांनी दोन दुचाकी व सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.

दोघेही बालमित्र

दोन्ही संशयित बालमित्र आहेत. महाविद्यालयात शिक्षणास दाखल झाल्यानंतर महागडे मोबाइल, कपडे व दुचाकी वाहन वापरण्यासाठी संशयितांनी जबरी चोरी करण्यास सुरुवात केल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे दागिने ओरबाडून त्याची विक्री करीत आलेल्या पैशांमधून दोघांनी मौजमजा केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा :

The post अल्पवयीन मुलांनी ओरबाडल्या पोती, सात लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.