आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी 

आमदार कोकाटे,www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे गुरुवारी (दि.२८) सकाळी ११:३० वाजता मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, मंजुळा गावित, नितीन भुसारा, वित्त विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भांगरे यांचे वासाळी येथे आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्मारक मंजूर झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते. तसेच स्मारकापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठवावा, असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा झाली. त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत काम व्हावे…

स्मारक देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे या बैठकीत ठरले. स्मारकासाठी एक समिती बनविण्याचे ठरले असून, त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी या समितीत असणार आहेत. झारखंड येथील बिरसा मुंडा स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक भव्यदिव्य बनवावे, अशी आग्रही मागणी आमदार कोकाटे यांनी या बैठकीत केली. त्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ मंजुरी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामास निधी कमी पडू नये व कामातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या दालनात बैठक घेण्याची आग्रही मागणी केली होती. बैठकीत अनेक विषयांना मंजुरी मिळाली. आदिवासी बांधवांची अस्मिता या स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणारच आहे, मात्र या भागात पर्यटनवृद्धी होऊन रोजगारही मिळणार आहे.

– माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर विधानसभा

हेही वाचा :

The post आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी  appeared first on पुढारी.