आश्चर्यम ! भाजप यादीत डेंजर झोनमधील ‘त्या’ चौघांना स्थान

BJP Lok Sabha List : लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर!

नाशिक ः मिलिंद सजगुरे

अब की बार ४०० पार, असा नारा देत केंद्रात सलग तिसऱ्यांंदा सत्तेत येण्याची निश्चयी भूमिका जाहीर करणाऱ्या भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस जणांची नावे असून, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच सर्वेक्षणांतर्गत डेंजर झोनमध्ये असलेल्या चौघांना यादीत स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घोषित पाचपैकी चार महिलांना दिलेली संधी हे यादीचे वैशिष्ट्य मानण्यात येत आहे. (BJP Lok Sabha List)

डॉ. भारती पवार (दिंडोरी), डॉ. सुभाष भामरे (धुळे), डॉ. हीना गावित (नंदुरबार), स्मिता वाघ (जळगाव) आणि रक्षा खडसे (रावेर) यांचा भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. डॉ. पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यागून दिंडोरीतून भाजपच्या कमळावर स्वार होत एकहाती विजयाची नोंद केली होती. शिवाय, केंद्रात राज्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले होते. तथापि, पाच वर्षांतील त्यांची कामगिरी लोकाभिमुख न राहिल्याची चर्चा होती. याव्यतिरिक्त, भाजपच्याच सर्वेक्षणात त्यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता संपुष्टात येऊन सलग दुसऱ्यांदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. धुळे मतदारसंघातही डॉ. सुभाष भामरे यांच्याऐवजी भाजप अन्य उमेदवारांचा शोध घेत असताना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा आपल्या जुन्या शिलेदाराला कौल दिला. २०१४ मध्ये प्रथम विजयाची नोंद केलेल्या डॉ. भामरे यांना थेट संरक्षण राज्यमंत्रिपदाचा मुकुट बहाल करण्यात आला होता. तथापि, त्यानंतरच्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही. आता ते विजयाची हॅट‌्ट्रिक साधतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (BJP Lok Sabha List)

नंदुरबार आणि गावित परिवार असे समीकरण बनले असताना डॉ. हीना गावित यांना वगळून भाजप अन्य चेहरा देईल, अशी अटकळ बांधली जात होती. तथापि, पक्षाने पुन्हा आपले वजन त्यांच्याच पारड्यात टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुड बुकमधील सहकारी अशी डॉ. गावित यांची ओळख आहे. वडील डॉ. विजयकुमार गावित महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवून उभे आहेत. अनेक वर्षांपासून ते कोणत्याही पक्षात असले तरी मंत्रिपदावर कायम राहिल्याने आदिवासीबहुल नंदुरबारवर त्यांनी चांगली पकड ठेवली आहे. या जोरावर कन्या डॉ. हीना यांना ते तिसऱ्यांदा संसदेचे द्वार उघडे करून देतात का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे. धक्कातंत्रासाठी ख्याती असलेल्या भाजपने जळगावमध्ये मात्र त्याचा वापर करीत उन्मेष पाटील यांना घरी बसवले आहे. पाटील यांंना दुसऱ्यांदा उमेदवारी नाकारत पक्षाने स्मिता वाघ यांना पसंती दिली आहे. (BJP Lok Sabha List)

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रावेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याने यंदा रक्षा खडसे यांचे तिकीट भाजप कापणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दस्तुरखुद्द नाथाभाऊच रावेरच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याने रक्षा यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता धूसर वाटत होती. मात्र, भाजपने तशी संधी त्यांना देत ना‌थाभाऊंना एकप्रकारे धर्मसंकटात टाकले आहे. आता ते राष्ट्रवादी पवार गटाकडून लढतात की निवडणुकीत ‘नरो वा कुंजरो वा’च्या भूमिकेत जातात, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरेल.

इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष..

दरम्यान, भाजपच्या यादीतील पाच उमेदवारांपैकी चौघांच्या नावांबाबत अनिश्चिततेचे सावट होते. दिंडोरीत डॉ. भारती पवार यांच्यापुढे सुप्रसिद्ध धावपटू कविता राऊत-तुंगार यांचा पर्याय उभा करण्यात आला होता. धुळ्यात डॉ. सुभाष भामरे यांच्याऐवजी निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर तसेच धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे ही नावे चर्चेमध्ये होती. रावेरमध्ये रक्षा खडसे नाही तर अन्य कोण म्हणून अमोल जावळे आणि केतकी पाटील यांची पर्यायी नावे समोर आली होती. नंदुरबारमध्ये डॉ. हीना गावित यांना, तर जळगावमध्ये उन्मेष पाटील यांच्याऐवजी गेल्यावेळी तिकीट कापले गेलेल्या स्मिता वाघ यांना यंदा पक्षांतर्गत स्पर्धक नसल्याने पक्षाला त्यांना संधी देण्यावाचूून तरणोपाय नव्हता, हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा ;

The post आश्चर्यम ! भाजप यादीत डेंजर झोनमधील 'त्या' चौघांना स्थान appeared first on पुढारी.