कहांडळवाडी खून प्रकरण : दारूच्या पार्टीनंतर तरुणाचा खून

दीपक भाऊसाहेब सोनवणे pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील कहांडळवाडी शिवारात आढळलेला मृतदेह सिन्नर व संगमनेर तालुक्यांच्या हद्दीवरील चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दीपक भाऊसाहेब सोनवणे (३६) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गावातच राहणारा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव व मित्र अजय सुभाष शिरसाट (रा. चास, ता. सिन्नर) यांच्यासह पोल्ट्रीवर खत भरायला जातो असे सांगून घराबाहेर गेला होता. मात्र त्यानंतर घरी परतला नव्हता.

सलग तीन दिवस तिघांचा थांगपत्ता लागत नसल्याने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २) दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्याच्याबरोबर असलेल्या दोघांचे मोबाइल बंद होते, त्यामुळे कुटुंबीयांच्या जिवाला घोर लागला होता.

बुधवारी (दि. ३) सकाळी चिचोली गुरव वावी रस्त्यावर कहांडळबाडी शिवारात पोल्ट्रीवरील परप्रांतीय तरुणांना काटेरी बाभळीच्या वाळलेल्या फासाआडून दुर्गंधी आली. या भागात शेतकरी पोल्ट्री फार्ममध्ये मृत झालेल्या कोंबड्या टाकत असतात. मात्र कामगारांना ही दुर्गंधी काहीशी वेगळी जाणवली. त्यांनी पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही बाब पोलिसपाटील रवींद्र खरात यांच्या माध्यमातून वावी पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. तोपर्यंत चिंचोली गुरव गावात याबाबतचे वृत्त समजले होते. नातेवाइकांनी दिलीप सोनवणे शिवेवरील तेथे धाव घेतली. मृतदेह दिलीपचा असल्याचे सर्वांनी ओळखले. मात्र, त्याचा चेहरा दगडांनी ठेचल्यामुळे ओळख पटत नव्हती.

वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेव आहेर, पारस वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र हा प्रकार खुनाचा प्रकार असल्याने सिन्नर ग्रामीण रुग्णालय व तिथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दोघे तरुण फरार
ही घटना घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते. पोलिसांना मृतदेहाजवळच दारूची पार्टी झाल्याचे पुरावे मिळाले होते. रक्ताने माखलेले दगड, झटापट झाल्याच्या खुणादेखील मिळाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. फरार असलेल्या दोन्ही संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

मावसभावासह दोघांवर खुनाचा गुन्हा
मृत दीपकचे भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात कृष्णा जाधव व अजय शिरसाट यांच्या विरोधात अज्ञात कारणासाठी दोघांनी भावास मारहाण करून त्याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. वावी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post कहांडळवाडी खून प्रकरण : दारूच्या पार्टीनंतर तरुणाचा खून appeared first on पुढारी.