कांदानगरीत केळीचा तोरा, पाचोरे येथील शेतकऱ्याचा माल थेट आखातात

कांदा नगरीत केळीचा तोरा,www.pudhari.news

लासलगाव : राकेश बोरा

केळी म्हटली की, डाेळ्यासमोर नाव येते, ते जळगाव जिल्ह्याचे. मात्र, आता कांदानगरीतही केळीचा तोरा पाहावयास मिळत आहे. लासलगावजवळील पाचोरे (खुर्द) येथील शेतकरी तानाजी आंधळे यांनी पाच एकर शेतात साडेसात लाख रुपये खर्चून केळीची शेती केली. ही केळी थेट अरब देशात निर्यात झाल्याने त्यांना यातून 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी आंधळे यांनी दिली आहे.

केंद्र सरकार कांदा धोरणाबाबत वारंवार हस्तक्षेप करत असल्याने कांद्याच्या दरात चढउतार होत आहेत. परिणामी कांद्याची शेती तोट्यात करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या समस्यांमुळे चिंताग्रस्त झालेला कांदा उत्पादक ग्रामीण भागात दिसत आहे. विशेषत: शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता, शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा, अशी कल्पना कांदानगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावजवळील पाचोरे (खुर्द) येथील कांदा उत्पादक शेतकरी तानाजी आंधळे यांना सुचली. त्यांनी जळगाव येथे जाऊन जैन इरिगेशनचे टिशू पेपर कल्चर ग्रँड नाइन या जातीच्या केळीची रोपे आणून दि. 26 डिसेंबर 2022 रोजी लागवड केली होती.

साडेसात लाखांचा खर्च

11 ते 12 महिन्यांनंतर केळीचे उत्पादन येण्यासाठी कालावधी लागत असल्याने यादरम्यान कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते. त्या कांद्याला उत्पादन खर्चही निघणार नाही, असा प्रतिक्विंटलला 500 ते 600 रुपये दर मिळाला होता. याचे दुःख न करतात केळी पिकावर लक्ष केंद्रित करून, केळीचे हार्वेस्टिंग केले. साधरण केळीच्या एका झाडावर सरासरी 37 ते 38 किलोंचे केळीचे घड निघत आहेत. पहिल्या खुड्यात 26 टन केळी निघाली. आता दुसऱ्या खुडा सुरू आहे, यात 50 ते 55 टन केळी निघणार आहेत. या पाच एकर केळीच्या शेतात 150 ते 155 टन केळीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा असून, याला साडेसात लाख रुपये खर्च आला आहे.

सुमारे 28 लाखांचे उत्पन्न अपेक्षित

सर्व केळी अरब देशात निर्यात केली जात आहेत. चांगला बाजारभाव आणि उत्पादन चांगले मिळत असल्याने, यातून 27 ते 28 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याने कांद्याने मारले, अन‌् केळीने तारले असे म्हणत कांद्यापेक्षा केळीच बरी असे म्हणत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी तानाजी आंधळे यांनी सांगितले.

अशी केली केळीची लागवड

जळगाव येथे जाऊन टिशू पेपर कल्चर ग्रँड नाइन या जातीच्या केळीची सहा हजार रोपे आणून, दि. 26 डिसेंबर 2022 रोजी पाच एकर शेतात आठ बाय चार वर बेड पद्धतीची लागवड केली दीड फुटाचा बेड ठेवला, याला ट्रीपचा वापर केला. या केळीला लिक्विड खते दिली. सात ते आठ महिन्यांत केळीची निसवण केली, या दरम्यान त्यांनी कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते. 11 महिन्यांनंतर केळीचे हार्वेस्टिंग सुरू झाले आणि साधरण केळीच्या एका झाडावर सरासरी 37 ते 38 किलोचे केळीचे घड निघत आहेत.

हेही वाचा :

The post कांदानगरीत केळीचा तोरा, पाचोरे येथील शेतकऱ्याचा माल थेट आखातात appeared first on पुढारी.