ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील 189 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या एक हजार 291 जागांसाठी दोन हजार 897 उमेदवार रिंगणात आहेत. थेट सरपंचपदाच्या 177 जागांसाठी 577 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, 745 मतदान केंद्रे अंतिम केली आहेत.

जिल्हाभरात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी ऐनभरात आली आहे. एकूण 196 ग्रामपंचायतींमध्ये माघारीनंतर 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर सदस्यांच्या एकूण 1 हजार 870 मधून 579 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 1291 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच 19 ग्रामपंचायतींनी जनतेमधून बिनविरोध निवडून दिल्याने प्रत्यक्षात 177 ठिकाणी सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतींमध्ये येत्या रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी थंडावणार आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जोर लावला आहे. निवडणुकीत सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना प्रशासनाने मात्र मतदान प्रक्रियेसाठीच्या तयारीवर भर दिला आहे. चौदाही तालुक्यांमध्ये एकूण 745 मतदान केंद्रे अंतिम करण्यात आली आहेत. त्यानुसार तालुक्यांना इव्हीएम आणि मतदान साहित्याचे वितरण केले गेले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सहा याप्रमाणे एकूण चार हजार 470 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून, त्या सर्वांचे मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शनिवारी (दि. 17) मतदान केंद्रावर रवाना होण्यापूर्वी त्यांना अंतिम प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बिनविरोध ग्रामपंचायती अशा…
जिल्ह्यात सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील किकवारी बु., ढोलबारे व महडचा समावेश आहे. याशिवाय कोटमगाव (ता. नाशिक), नारायणगाव (ता. चांदवड) तसेच जयपूर (ता. कळवण) याही ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या.

निवडणूक द़ृष्टिक्षेपात
एकूण ग्रामपंचायती                  196
बिनविरोध पंचायती                    07
बिनविरोध सरपंच                      19
बिनविरोध सदस्य                     579
जागांची संख्या                       1291
सरपंचासाठी मतदान जागा        177
एकूण मतदान केंद्रे                   745
कर्मचारी संख्या                     4470

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार appeared first on पुढारी.