चिवचिव चिमणे..अगं ए चिमणे; चिऊताईचा किलबिलाट वाढतोय

World Sparrow Day

आनंद बोरा : पुढारी वृत्तसेवा

चिमणी, लहानपणी ज्या पक्ष्याशी पहिली ओळख होते ती चिऊताई… पण या चिऊताईंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, असे जरी म्हटले जात असले, तरी गेल्या दोन वर्षांपासून चिमणी संवर्धन उपक्रमाने झालेल्या जनजागृतीमुळे चिमण्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे.

दहा वर्षांपूर्वी गावात, घरच्या वळचणीला, दाराला टांगलेल्या फोटोफ्रेममागे चिऊताईची घरटी हमखास दिसायची. दिवसभर गवताच्या, पेंढांच्या काड्या जमवित त्यामधे कापूस, धागे, पिसे आणून घर सुशोभित करीत या चिमण्यांच्या चिवचिवाटाची जणू प्रत्येक घराला सवयच झाली होती. तपकिरी मान, काळ्या पिवळ्या रंगाच्या रेघा आणि खालचा भाग पांढरा शुभ्र ही तिची अल्प ओळख सहज करता येईल. जमिनीवर पडलेले धान्य, बी, दाणे इतकेच काय, तर घरातील पोळ्यादेखील खाणारी ही चिऊताई पर्यावरणपूरक कामदेखील करते. घोडे, म्हैस ज्या गावांत जास्त, तिथे चिमण्यांची संख्यादेखील जास्त असते. कारण या प्राण्यांच्या विष्ठेतील न पचलेले धान्य त्या खातात. तसेच पिकांचा नाश करणाराऱ्या असंख्य कीटकांना खाऊन त्या शेतकऱ्यांच्या मित्रच झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत पक्षी अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणात चिमण्यांची संख्या शहरालगतच्या गावांत वाढत असल्याचे दिसून आले आहे.

शहरी सिमेंटची जंगले
काळाबरोबर गाव, शहरे बदलू लागली आहेत. जुनी लाकडी घरे, वाडे, गुरांचे गोठे आता शहरातून जणू हद्दपारच झाली आहेत. त्या जागी चकाचक बंगले, गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. घरात आता पक्ष्यांना नो एन्ट्री आहे. एका संस्थेच्या अहवालानुसार चिमण्यांच्या संख्येत गेल्या 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पुढे आले आहे. चिमण्यांच्या संख्येत घट होणाऱ्या अनेक कारणांमध्ये मोबाइल टॉवर हीदेखील समस्या आहे. टॉवरमधील विद्युतचुंबकीय लहरी (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) पक्ष्यांना हानीकारक ठरतात. या लहरींमुळे चिमण्या आपली वसतिस्थाने बदलत आहेत. ते पर्यावरणासाठी घातक आहे.

वृक्षतोडीमुळे शिकारी पक्ष्यांच्या निशाण्यावर चिमण्या
शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोडदेखील तितकीच जबाबदार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो वृक्ष तोडले गेले. आज त्र्यंबक, दिंडोरी रोड, नाशिक-पुणे रोड, पेठ रोड आदीच्या विस्तारात वड, पिंपळ यांसारखे डेरेदार वृक्ष तोडले आहेत. याचा परिणाम त्यावर वास्तव्य करणारे ससाणा, शिक्रा, घारीसारखे शिकारी पक्षी शहरात येऊन घरटी तयार करू लागली आहेत. त्यामुळे निसर्ग साखळीदेखील धोक्यात येऊ लागली आहे.

चिमण्या वसतिस्थाने बदल नाहीत
चिमण्या शक्यतो आयुष्यभर आपल्या ठराविक मर्यादित क्षेत्रातच राहतात. कारण त्या परिसरातील फुले, कुठल्या झाडाला कधी फळ येणार, पाण्याची जागा, अंघोळीची जागा, योग्य निवारा अशा सर्व बाबी त्यांना माहिती असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य सोपे व सुखकर होते. दिवाळीच्या उत्सवात आपण मोठ्या प्रमाणात फटाके उडवितो. या प्रचंड आवाजाने पक्षी घाबरतात व ते आपली वसतिस्थळे सोडून शहर सोडून निघून जातात. फटाक्यांच्या आवाजामुळे अनेक पक्षी नैसर्गिक आवाजाऐवजी मोठ्याने ओरडू लागले आहेत. ते पक्ष्यांच्या संवर्धनात धोक्याची घंटा वाजवत आहेत. ध्वनी प्रदूषण आता चिमण्यांच्या मुळावरच उठत आहे.

गलोरवर यावी बंदी
आदिवासी पाड्यांवर फेरफटका मारला असता, तेथील प्रत्येक मुलाच्या हातात गलोर दिसते. गलोरीने आतापर्यंत हजारो पाखरांचा बळी घेतला आहे. जोपर्यंत गलोरीवर बंदी येत नाही, तोपर्यंत निष्पाप पक्षांचे जीव जातच राहणार. या परिसरात विद्यार्थ्यांची जनजागृती करणे आवश्यक असून त्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे.

जागतिक चिमणी दिन सुरू करणारे मोहंमद दिलावर आहे नाशिकचे
आधुनिक जीवन शैलीत माणसाला दुर्मीळ झालेल्या या चिमण्यांचा चिवचिवट परत मिळविण्यासाठी नाशिकच्या नेचर फॉर एवर सोसायटीचे अध्यक्ष मोहमद दिलावर यांनी प्रथमतः ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ची सुरुवात केली. ही बाब नाशिकसाठी भूषणावह आहे. जागतिक चिमणी दिवसाची स्थापना 2010 मधे दिल्ली येथे शीला दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस जगात उत्साहात साजरा केला जातो. चिमण्यांविषयी जनजागृती व संवर्धन व्हावे हा या मागचा उद्देश आहे.

काय करायला हवे…
1] अंगणात, गॅलरीत पिण्यासाठी पाणी ठेवणे
2] कृत्रिम घरटे लावून आसरा देणे
3] ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न
4] शहरातील टॉवरचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी
5] घराजवळ बागेत एक तरी वृक्ष लावावा
6] जखमी पक्ष्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे
7] चिमणी बचाव पर्यावरण बचाव उपक्रम राबविणे
8] गलोरीवर कायमची बंदी
9] नायलॉन मांजावर बंदी

पूर्वी चाळी, कौलारू घरे असायची. घरातील बायका धान्य बाहेर टाकायच्या. त्यामुळे या चिमण्यांना धान्य व त्याच्यातील कीडे मिळायचे आणि त्या घराच्या परिसरातच राहायच्या. आज मॉल संस्कृती व राहण्याच्या अडचणीमुळे रेडिमेड पॅकबंद निवडलेले धान्य मिळायला लागल्यामुळे चिमण्यांना अन्न मिळणे बंद झाले. प्रत्येकाने आपल्या घरी किमान पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. – चंद्रकांत दुसाने, ज्येष्ठ पक्षिमित्र.

पक्ष्यांचे शहारातील कमी झालेले प्रमाण बघून निवृत्तीनंतर चिमणी बचाव पर्यावरण बचाव हा उपक्रम सुरू केला. चपला-बुटांच्या रिकाम्या खोक्याचा वापर करून माझ्या रो हाउसच्या पार्किंग प्लेसमध्ये लावल्यानंतर या परिसरात शेकडो चिमण्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. चिमण्यांचे घर म्हणून माझ्या घराकडे बघितले जाते. चिमणी हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. चिमण्या वाचल्या, तरच आपण वाचणार आहोत. – भीमराव राजोळे, ज्येष्ठ पक्षिमित्र.

गेल्या पाच वर्षांपासून मी लाकडी पक्ष्यांची कृत्रिम घरटी तयार करत आहे. कोणत्या पक्ष्याला कोणते घरटे हवे, याचा अभ्यास करून मी 30 प्रकारची घरटी तयार केली आहेत. घरटी तयार करणे हा अभ्यास आहे. घरटी कुठे लावावी, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी मी पक्षिप्रेमींना मार्गदर्शन करीत असतो. आतापर्यंत शेकडो घरटी मी वाटली आहेत. -उमेशकुमार नागरे, पक्षिमित्र.

The post चिवचिव चिमणे..अगं ए चिमणे; चिऊताईचा किलबिलाट वाढतोय appeared first on पुढारी.