चोरट्यांकडून तब्बल १९ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास 

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. सातपूर कॉलनी मधील श्री दक्षिण मुखी इच्छा पूर्ती साईनाथ मंदिर जवळ निळधारा सोसायटीमध्ये चोरट्यांनी दि.७. फेब्रुवारी रोजी रात्री १ ते पहाटे ४ वाजे दरम्यान घराचे कुलूप तोडून घरातील १९ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने व दोन लाख रुपये लंपास केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश नामदेव महाले हे आठ हजार कॉलनी मधील घर नंबर १६८१ सातपूर कॉलनी श्री दक्षिणमुखी इच्छा पूर्ती साईनाथ मंदिर जवळ यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली. संपूर्ण कुटुंबं हे दि. ६ रोजी एक दिवसा करता मुंबईला गेले होते. याचदरम्यान, चोरटयांनी आत प्रवेश करून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेले कपाट फोडून तेथून १९ तोळे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. यासोबतच घरातील कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत श्वान पथकासह घटनास्थळावरून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना शोधून महाले यांना न्याय द्यावा असे यावेळी पोलिस प्रशासनास सांगितले. दरम्यान याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी तपासकामी पाहणी केली.

The post चोरट्यांकडून तब्बल १९ तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास  appeared first on पुढारी.