भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह; शहर-ग्रामीणमध्ये जोरदार तयारी

Rahul Gandhi

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी (दि. १३) मालेगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यात्रेची जोरदार तयारी केली असून यात्रा मार्ग, चौक सभांचे नियोजन केले आहे. तसेच शहर पदाधिकाऱ्यांनीही जय्यत तयारी करीत यात्रा मार्गात देखावे, स्वागत कमान, फलकबाजी करून वातावरण निर्मिती केली आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसला यश मिळावे यासाठी खा. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. ते विविध प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत आहेत. यात्रा जिल्ह्यात बुधवारी दाखल होणार असून दीड दिवस खा. गांधी जिल्ह्यात थांबून विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. यात्रा मार्गात वातावरण निर्मिती केली असून ठिकठिकाणी समस्यांचे फलक, देखावे उभारण्यात येणार आहेत. तसेच यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी पदाधिकाऱ्यांनी संवाद यात्रा काढत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर राहुल गांधी हे गुरुवारी (दि.१४) व्दारका ते शालिमार असा रोड शो करणार असून त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार, मोखाडा येथून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

आज बुधवारी (दि. १३) नाशिक ग्रामीण मधील खा. गांधी यांचा दौरा असा..
दुपारी २.३० वाजता मालेगाव येथील झोडगे येथे खा. राहुल गांधी यांचे आगमन
दुपारी ३ वाजता मालेगाव शहरात आगमन
दुपारी ३ ते ५ या वेळेत दरेगाव- नवा बस स्थानक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – महात्मा ज्योतिबा फुले पुतळा मार्गे यात्रा जाणार
सायंकाळी ६ वाजता मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे गांधी यांचा मुक्काम.
गुरुवारी (दि. १४) ग्रामीण भागातील दौरा असा…
सकाळी ८.३० वाजता चांदवडकडे राहुल गांधी जाणार
सकाळी ९ वाजता चांदवड येथे शेतकरी संवाद सभा होणार आहे.
दुपारी १२ वाजता पिंपळगाव बसवंत येथे आगमन
दुपारी १ वाजता ओझर येथे आगमन
दुपारी २ ते ५ या वेळेत शहरात यात्रा
सायंकाळी ५.३० वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
त्यानंतर मोखाडा येथे मुक्काम राहणार आहे.

तालुकानिहाय नियोजन
यात्रा कमी कालावधीत जाणार असल्याने जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी टप्प्याटप्यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार बुधवारी मालेगाव येथील यात्रेत सटाणा, मालेगाव, नांदगाव, मनमाड तालुक्यांमधील कार्यकर्ते सहभागी होतील. गुरुवारी चांदवड येथील सभेत चांदवड, येवला व देवळा येथील कार्यकर्ते सहभागी होतील. पिंपळगाव बसवंत येथील यात्रेत निफाड, दिंडोरी, सुरगाणा, कळवण तालुक्यांमधील कार्यकर्ते उपस्थित राहतील. ओझर येथे सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमधील कार्यकर्ते गांधी यांच्या यात्रेत सहभागी होतील. तर त्र्यंबकेश्वर येथे पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

असा असेल शहरातील यात्रा मार्ग
द्वारका उड्डाणपुल येथून सारडा सर्कल, दुधबाजार, खडकाळी, गंजमाळ सिग्नल, शालिमार येथे यात्रा येईल. शालिमार येथील इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथे एक चौकसभा होणार आहे. त्यानंतर यात्रा सीबीएस, त्र्यंबकनाका सिग्नल, गोल्फ क्लब मार्गे मायको सर्कल, सातपूरपर्यंत यात्रा राहिल. त्यानंतर यात्रा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणार असून सायंकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात खा. गांधी हे अभिषेक करणार असून तेथून ते मोखाड्याच्या दिशेने रवाना होतील.

The post भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह; शहर-ग्रामीणमध्ये जोरदार तयारी appeared first on पुढारी.