जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात

छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी आहे. अशातच आता जरांगे पाटील यांनी सरकारपुढे आणखी एक नवीन मागणी केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. ‘आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना जात प्रमाणपत्र द्या’, अशी मागणी जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली आहे. ‘आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. आईच्या जातीच्या दाखल्यावरून तिच्या मुलांना देखील जात प्रमाणपत्र द्या’, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

जरांगे पाटील यांची मागणी लॉजिकल असून ते सांगताय तसे करुन टाका असा उपरोधिक टोला छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे. भुजबळ म्हणाले, जरांगे सांगतात त्याप्रमाणे सरकारने करावं, अन्यथा ते मोर्चा काढतील. आईच काय तर पत्नीचे आई-वडिल असतील त्यांचेही नातेवाईक असतील त्या सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. जरांगेंच्या डोक्यात वेगवेगळ्या अभिनव कल्पना येत असतात मग मंत्र्यांना सारखं-सारखं जरांगे पाटील यांच्याकडे जावे लागते. त्यापेक्षा  दोन-चार मंत्र्यांचे बंगले अंतरवालीत बांधायला हवेत, जेणेकरुन जरांगे सांगतील तसे पटकन जीआर काढता येतील. कायदा आडवा येत असेल तर कायदा कायद्याच्या ठिकाणी ठेवा, पण सरकारने जरांगे सांगतील तसे काम करायला पाहिजे. जरांगे यांच्या मागे मोठा समाज आहे, त्यांचे ऐकले नाहीतर सरकारला सुद्दा महागात पडेल हे सरकारने ध्यानात घेऊन काम करावं असे भुजबळ म्हणाले.

देव जरी आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण मिळण्यापासून रोखू शकत नाही असे जरांगे यांनी म्हटले होते. त्यावर भुजबळ म्हणाले, देव सुद्धा त्यांना घाबरतो, तेव्हा सरकार काय चीज आहे. सरकारने आता जरांगेंना घाबरुन काम करायला पाहिजे. जरांगेंच्या मागे मोठा समाज आहे. एवढे लोक सरकाच्या विरोधात गेले तर सरकारचं काही खरं नाही. म्हणून आता माझाही त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. मी आजवर त्यांच्याविरोधात जी भाषणे केली होती, ती मागे घेतो आहे. माझा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे. हवेतर कायदे बदलून टाका पण त्यांची मागणी पूर्ण करा. जरांगे पाटील यांची काहीही चूक नाही, त्यांनी सरकारला नव्हे तर सरकारनेच त्यांना वेठीस धरलं आहे. माझ्या पुढच्या मेळाव्यात मी तर आता जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार असल्याचा टोला भुजबळांनी लगावला.

हेही वाचा :

The post जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात appeared first on पुढारी.