जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी जळगावात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. सरकारकडून केवळ इव्हेंट साजरे केले जातात. घोषणा केल्या जातात मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेच्या आत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न सोडविण्यात यावे, अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा इशारा आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष वेधले याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडीच्या कल्पना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 27 जून रोजी जळगाव “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी येत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार खडसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 60 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. जिनिंग प्रेसिंग बंद असल्यामुळे 12 हजार रुपये भावाने विकला जाणारा कापूस आता 6 हजाराच्या भावात देखील कोणी घेत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार खडसे यांनी केली आहे. तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वादळ, गारपीट आणि सीएमव्ही आजारामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती. मात्र अद्यापही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे. मुख्यमंत्री चार वेळा जिल्ह्यात येऊन गेले वेगवेगळ्या घोषणा केल्यात मात्र त्यांची पूर्तता होत नसल्याची टीका आमदार खडसे यांनी केली.

पोलिसांची हप्तेखोरी सुरू

जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. जुगार, वाळूमाफिया हप्ते देऊन आपले काम राजरोसपणे बजावत आहे. गावठी कट्टे, गांजा, गुटखा तस्करी वाढली आहे. या संदर्भात 21 वेळा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली तरी देखील कारवाई होत नाही. दोन तीन दिवसाआड खून, दरोडे आणि महिला अत्याचाराच्या घटना होत आहे. पोलीस मात्र हप्ते वसुली मग्न असल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.

जिल्ह्यात पाणीपुरवठा मंत्री असताना देखील पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. मात्र केवळ 25 टँकर सुरू आहे. टँकरची मागणी होऊनही पुरवले जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बोदवड तालुक्यातील 44 गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. मात्र पाण्याचा कुठलाही सोर्स न तपासता, कुठलाही सर्वे न करता योजनेला वर्क ऑर्डर देण्यात आले आहे. त्यामुळे या योजनांमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांना केवळ कोकणातील शेती दिसते…

मुख्यमंत्र्यांना केवळ कोकणातील शेतीची माहिती आहे. केवळ टीव्हीवर झळकण्यासाठी शेतकरी असल्याचे दाखवतात, त्यांना इतर जिल्ह्यातील कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात येत नाहीत का? शेतमाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसानही झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार कुठलीही मदत शेतकऱ्यांना करत नसल्याची टीका आमदार खडसे यांनी केली.

The post जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार appeared first on पुढारी.