जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जिल्हाधिकारी जलज शर्मा,www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून पाणी संघर्ष निर्माण झाला असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण बैठकीचा संदर्भ देत नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग न करता जायकवाडीच्या मृत साठ्यातूनच मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यासाठी नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. त्यावरून मराठवाडा विरुध्द नाशिक-नगर पाणीसंघर्ष पेटला आहे. गंगापूर धरणातून ०.५ टिएमसी पाणी सोडण्यास आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोध केला आहे. पाणी सोडण्यास विरोध नाही; परंतू गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने दारणा धरणातून पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या ५ डिसेंबर २०२३ रोजी त्यावर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात दाखल हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू यापुर्वीही टंचाई निर्माण झाली असताना मृतसाठ्यातून पाणी उपसण्यास परवानगी असताना नाशिक व नगरच्या पाण्यासाठी हट्ट धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेला प्रस्ताव नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

काय आहे प्रस्ताव?

जायकवाडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून सन २०१५ मध्ये ०.५ टिएमसी पाणी वापरण्याची परवानगी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली होती. त्याचप्रमाणे मृत साठ्यातून सन २०१२, सन २०१५ व सन २०१८ मध्ये सुमारे १० टिएमसी पाण्याचा वापर केला आहे. त्या धर्तीवर मृत पाणीसाठ्याचा वापर पुन्हा केल्यास नाशिकमध्ये पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे नोंदविला आहे.

या मुद्यांवरही चर्चा अपेक्षित

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने यापूर्वीच सर्व यंत्रणांना पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. विशेषत: अल निनो वादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त करत पाणी जपून वापरण्याचे पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून पाठविले होते. नाशिक महापालिकेने त्यानुसार कार्यवाही केली. मात्र, छत्रपती संभाजीनगर महापालिका तसेच जायकवाडी धरणावरील नगरपालिकांनी शासनाच्या पत्राची दखल का घेतली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

हेही वाचा :

The post जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.