ड्रग्ज प्रकरणामुळे नाचक्की; पोलिस निरीक्षकांची बदली?

नाशिकरोड पोलिस स्टेशन,www.pudhari.news

नाशिकरोड, पुढारी वृतसेवा ; येथील नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्यासह दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याची चर्चा नाशिक रोड परिसरात केली जाते आहे. याप्रश्नी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप बदलीचे आदेश आलेले नाहीत असे सांगितले. त्यामुळे चर्चेत भर पडत आहे. (Nashik Drug Case)

नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स आढळले होते. पोलिसांनी दोन वेळेस छापा टाकून कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत केला. त्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाणे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या पोलीस ठाणे हद्दीत असे प्रकार सुरू असल्यामुळे वांजळे यांच्यासह येथील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या ड्रग्स अड्ड्यामुळे पोलिसांची प्रचंड नाचक्की देखील झाली होती. त्यामुळे शुक्रवारी ( दि.१३ ) रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची नियंत्रण कक्षात तर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांची नार्को टेस्ट विभागात आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांची बदली झाल्याची चर्चा केली जात आहे. पोलीस ठाण्यात बदली विषयी आदेश अद्याप प्राप्त झाले नसले तरी पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचा तात्पुरता कारभार पवन चौधरी यांच्याकडे सोपविला असल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की अद्याप बदलीचे आदेश प्राप्त झालेले नाही त्यामुळे याविषयी मी आधी काही माहिती देऊ शकत नाही असे सांगितले.

हेही वाचा :

The post ड्रग्ज प्रकरणामुळे नाचक्की; पोलिस निरीक्षकांची बदली? appeared first on पुढारी.