त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा

हंडा मोर्चा www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने ञ्यंबक पंचायत समिती कार्यालयावर मंगळवारी एल्गार कष्टकरी संघटनेने देवगाव येथील पाणी पुरवठा बाबत हंडा मोर्चाचे आयोजन केले होते. महिलांनी हंडे डोक्यावर घेऊन पंचायत समिती कार्यालयावर धडक मारली व गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठाण मांडले. त्यामुळे काही वेळ प्रशासनाची धावपळ उडालेली पहावयास मिळाली.

ञ्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरवाडी आणि लचकेवाडी येथे पाणी पुरवठयाची सुविधा उपलब्ध नसल्याने येथील महिलांना दोन किमी अंतरावर असलेल्या टाकेदेवगाव, पाझरतलाव या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जावे लागते. डोक्यावर हंडे घेऊन दोन किमी पायपीट करावी लागते. अशुध्द पाणी वापरल्याने विविध आजार जडत आहेत. तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 85 पाणी पुरवठयाच्या योजनांची कामे सुरू आहेत. मात्र प्रशासनाला डोंगरवाडी आणि लचकेवाडी या दोन वस्त्यांचा विसर पडला आहे. याविरूध्द दाद मागण्यासाठी मंगळवारी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन ञ्यंबक पंचायत समितीवर मोर्चा काढला.

मोर्चाने आलेल्या महिलांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठाण मांडले. अखेर प्रशासनाने याची दखल घेतली. देवगाव ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी येत्या 10 ते 15 दिवसांच्या आत डोंगरवाडी व लचकेवाडी येथील पाणीपुरवठा समस्या मार्गी लावण्याचे लेखी अश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकरी महिला माघारी परतल्या.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वरला डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समिती कार्यालयावर महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.