त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज : वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह ठेवणार बंद

त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : जि. नाशिक पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शिवपिंडीच्या निघालेल्या वज्रलेपाची औरंगाबाद येथून आलेल्या पुरातत्त्व विभागाच्या पथकाने पाहणी केली. पिंडीला वज्रलेप करावा लागणार असल्याचे या पथकाने स्पष्ट केले. मंदिरातील वज्रलेपाच्या कामासाठी तीन दिवस गर्भगृहातील दर्शन बंद ठेवावे लागेल, असेही या पथकाने स्पष्ट केले

औरंगाबादहून आलेल्या पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या पथकामध्ये रसायनशास्त्र, मूर्तीशास्त्र यासह सर्व शाखांच्या अधिकार्‍यांचा समावेश होता. पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक मिलन चावला, दानवे, दीपक चौधरी, मिश्रा, रविकुमार व अन्य चौघा तज्ज्ञांनी पिंडीची तासभर पाहणी केली. पुरातत्त्व विभागाचे पाहणी पथक जवळपास तासभर गर्भगृहात होते. यापूर्वी केलेल्या वज्रलेपाची माहिती त्यांनी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांकडून घेतली. यावेळेस पथकासमवेत ट्रस्टचे अध्यक्ष न्या. विकास कुलकर्णी, पूजक प्रतिनिधी डॉ. सत्यप्रिय शुक्ल, पुजारी प्रतिनिधी दिलीप तुंगार, प्रदीप तुंगार, कैलास देशमुख, मिलिंद तारे, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, आमोल माचवे आदी उपस्थित होते.

पथकातील अधिकारी, तंत्रज्ञ आणि त्यांच्यासोबत असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष न्या. विकास कुलकर्णी व काळाराम मंदिर विश्वस्त व वास्तुविशारद मिलिंद तारे या सर्वांनी सोवळे परिधान करत गर्भगृहात प्रवेश केला. न्या. कुलकर्णी यांनी दहा दिवसांपूर्वी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. प्रदोष पुष्प पूजक उल्हास आराधी गुरुजी व अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांना शिवपिंडीबाबत सर्व माहिती दिली. यावेळेस पुजारी श्रीपाद देशमुख हेही गर्भगृहात उपस्थित होते.

पुजार्‍यांकडून धार्मिक माहिती जाणून घेतल्यानंतर संबंधित अधिकारी आणि तंत्रज्ञ यांनी आतील सर्व भागाची बारकाईने पाहणी केली व मोजमापे घेतली. पुरातत्त्व विभागाचे पाहणी पथक जवळपास तासभर गर्भगृहात होते. सर्व उपस्थितांनी भगवान त्र्यंबकराजाची पूजा केली. या पथकाने पिंडी सभोवतालची चांदीची पाळ सभामंडपात ठेवत त्याचे मोजमाप घेतले. त्यानंतर मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या देणगी दर्शनबारीच्या कामाची पाहणी केली. नंदीकेश्वर मंदिराच्या तुटलेल्या दगडी जाळ्या आणि दीपमाळ याचीसुद्धा माहिती पथकाने घेतली.

वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह बंद ठेवणार
अधीक्षक मिलन चावला यांच्याशी मंदिराच्या विश्वस्तांनी चर्चा करत चावला यांनी वज्रलेप करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. मंदिरातील वज्रलेपाच्या कामाला तीन दिवस गर्भगृहातील दर्शन, जलाभिषेक आदी विधी बंद ठेवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळेस डागडुजी आणि अन्य सर्व कामे करावयाची असून, पुढची किमान 90 वर्षे पाहावे लागणार नाही, अशी हमीही या पथकाने दिली. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या आठवडाभरात काम सुरू होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुरातत्त्व खात्याकडून भाविकांच्या सुविधांसाठी कोणताही अडथळा येणार नाही, अशीही हमी त्यांनी दिली.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वराच्या शिवपिंडीची झीज : वज्रलेपासाठी 3 दिवस गर्भगृह ठेवणार बंद appeared first on पुढारी.