दिरंगाई भोवली, मनपाच्या तिघा कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महानगरपालिका हद्दीत मंजूर केलेल्या १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या उभारणीत दिरंगाई केल्याप्रकरणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी उपकेंद्रांच्या ठेकेदारासह कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे, संदेश शिंदे आणि सचिन जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या ३० आरोग्य केंद्रांतर्गत १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेसाठी ६५.५० कोटींचा निधी मंजूर केला. परंतु महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे या उपकेंद्रांची उभारणी रखडली आहे. जेमतेम एकच उपकेंद्र निर्माण होऊ शकले असून, त्याचीही अवस्था समाधानकारक नाही. उर्वरित उपकेंद्रांच्या उभारणीत विलंब झाल्याने शासनाचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री डॉ. पवार यांनी महापालिका प्रशासनाची कानउघाडणी केली होती. किमान ३० उपकेंद्रे ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करावी, असा अल्टीमेटम त्यांनी दिला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. करंजकर यांनी ठेकेदारांसह मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. उपकेंद्राच्या उभारणीत विलंब केल्याप्रकरणी संबंधित ठेकदारासह या कामाची जबाबदारी असलेल्या सातपूर व पश्चिमचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव, पंचवटी व नाशिकरोडचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे व नाशिक पूर्व व सिडकोचे कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे यांना आयुक्त डॉ. करंजकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आजी-माजी लोकप्रतिनिधींचा विरोध

या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या उभारणीतील विलंबामागे आजी-माजी लोकप्रतिनिधींचाही संबंध असल्याची चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे. उपकेंद्रांच्या नियोजित मिळकती आजी-माजी आमदार, पालिकेतील माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांशी संबंधित संस्था, संघटनांनी बळकावल्या आहेत. संबंधित लोक या मिळकतींचा ताबा सोडण्यास तयार नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे.

उपकेंद्रांची स्थिती

महापालिकेच्या सहा विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यवर्धिनी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सिडको विभागात २२, पंचवटी विभागात २०, नाशिकरोड विभागात १८, सातपूर विभागात १६, पश्चिम विभागात १४, पूर्व विभागात १६ आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. सद्यस्थितीत १०६ पैकी अवघे एक आरोग्य उपकेंद्र तयार असून, उर्वरित १०५ पैकी ९२ उपकेंद्रांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ९२ जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी ३९ उपकेंद्रांची निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post दिरंगाई भोवली, मनपाच्या तिघा कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा appeared first on पुढारी.