अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका, ‘नो वर्क नो पे’ चे आदेश

नाशिक: पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे. गेल्या २४ दिवसांपासून सुरु असललेल्या या संपामध्ये अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. संपाचा फटका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बसला असून राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ‘नो वर्क नो पे’ या अनुषंगाने मानधन थांबविण्याचे आणि पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले आहेत.

जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करुन सर्व अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. या संपाचा फटका लाखो बालकांना बसत असून अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची तब्बल तीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मुलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम झाला आहे. तोडगा निघत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्र काढत बालकांना नियमित पोषण आहार मिळावा, यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत.

यात गावातील महिला बचत गट, स्वंयसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करावे, असे सांगितले आहे. तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे तसेच संप काळात मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

राज्य शासनाच्या पत्रानुसार कार्यवाही सुरु आहे. बालकांना पोषण आहार देण्याबाबत पर्यायी व्यवस्था तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले आहेत.

– प्रताप अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा पपरिषद नाशिक


हेही वाचा :

The post अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका, 'नो वर्क नो पे' चे आदेश appeared first on पुढारी.