ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत

Nashik Dashrath Patil

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा- गेल्या १५ वर्षांपासून नाशिक हे नेतृत्वहीन आहे. सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमधील ७० टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. दुसरीकडे कांद्याला भाव नाही. भाव वाढला, तर निर्यातबंदी, द्राक्षाला अवकाळीचा फटका बसला. मदतीसाठी कोणी पुढे येत नाही. आपण आता दिल्ली सोडणार नाही आणि प्रेमला गल्ली सोडू देणार नाही. तुम्ही सर्व जण साथ द्या, अशी भावनिक साद माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिककरांना घालत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते तथा उद्योजक प्रेम दशरथ पाटील व रोहित पाटील यांनी केले होते. यावेळी बोलताना दशरथ पाटील म्हणाले की, प्रत्येक राजकीय व्यक्ती आपली प्रतिष्ठा जपण्यात मग्न आहे. परंतु ती जपताना आपला जिल्हा व परिसराचा विकास कसा होईल, हेदेखील बघितले पाहिजे. नाशिकच्या कंपन्या मुंबई, औरंगाबाद, पुणे येथे जात आहेत. धरण उशाशी असून, २००२ अगोदर नाशिक शहरात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मी धरणात थेट पाइपलाइन योजना राबवून नागरिकांच्या दारात नळाला पाणी दिले. १०० एकरांत आयटी पार्क येणार अशी घोषणा दरवेळी करतात. २५ वर्षे झाली परंतु आयटी पार्क नाही. मी महापौर असताना आणि नसताना आजही नाशिककरांवर करवाढ लादू दिली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

येत्या कुंभमेळ्यासाठी १० हजार कोटी रुपये यांना खायचे आहेत. मी केवळ ६६ कोटींमध्ये कुंभमेळा यशस्वी केला व विकासकामेदेखील केली हाेती. शहराला जोडणारे सर्व रिंगरोड माझ्या काळात झाले. जनतेचे पैसे व्यवस्थित सांभाळून कामे करायची असतात. आता राजकारणामध्ये सक्रिय सहभागी होऊन घाण साफ करायची आहे. लोक विचारतात आता कोणत्या पक्षातून लढणार. परंतु सर्वच पक्ष माझे आहेत. परंतु जुने तेच सोने असते. त्यामुळे मी उद्धवसाहेबांशी चर्चा करणार आहे. निरोप पाठवणार आहे. मी आता दिल्ली सोडणार नाही आणि प्रेमला गल्ली सोडू देणार नाही. तुम्ही सर्व जण मला साथ द्या, अशी भावनिक साद त्यांनी घातली.

वाढदिवसानिमित्त सकाळी गंगापूर गाव येथील दत्त मंदिर, कालिकामाता मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिर येथे अभिषेक व महाआरती करून आशीर्वाद घेतले. सातपूर जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा झाल्या. वाढदिवसानिमित्त ॲड. बाळासाहेब वाजे, माणिक बोरस्ते, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ उपाध्यक्ष कैलास भोसले, ज्ञानेश्वर गोडसे, वसंतराव मोगल, सुरेश पाटील, युवा उद्योजक प्रेम दशरथ पाटील, उद्योजक दिलीप गिरासे, डॉ. प्रीतेश मोगल, हेमलता कांडेकर, सविता करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

द्राक्षासाठी आंदोलन

आपण शेतकऱ्याचा मुलगा असून, २००६ मध्ये शेतकऱ्यांच्या वेदना सहन झाल्या नाहीत म्हणून द्राक्षाच्या माळा घालून रास्ता रोको आंदोलन केले होते, याकडे दशरथ पाटील यांनी लक्ष वेधले

हेही वाचा :

The post ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत appeared first on पुढारी.