देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

देवना साठवण तलाव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध झाली असून, बहुप्रतीक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ लक्ष रकमेच्या या कामाला २१ जानेवारी २०२१ रोजी जलसंधारण महामंडळाकडून मंजुरी मिळाली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ ला जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता यांनी ८ कोटी ९५ लाख किमतीला तांत्रिक मान्यता दिली. कोविड असताना कोविडमधील आर्थिक निर्बंधांमुळे सर्व कामे स्थगित झाली होती. कोविड संपल्यानंतर या कामावरील स्थगिती उठवण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये तीन निविदाधरकांनी निविदा भरल्या. ही निविदा मुख्यमंत्र्यांच्या समितीकडे मंजुरीसाठी गेली.

ही योजना ही वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे निविदा मंजुरीनंतर तिन्ही निविदाधारकांनी काम करण्यासाठी नकार कळवला. या कामाची फेरनिविदा काढण्यासाठी छगन भुजबळ यांचा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. फेरनिविदेसाठी पाठपुरावा करण्यात आल्यामुळे कालच या योजनेची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंत्राटदाराला हे काम मिळण्यानंतर कंत्राटदाराने पाठपुरावा करून फॉरेस्ट क्लिअरन्स करण्याचे बंधन या कामाच्या अटी-शर्तींमध्ये आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्सचे काम होणार आहे.

देवना साठवण तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून, येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु., या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच, वन्यप्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटिकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २.०८ दलघमी (७३.४४ दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर असे एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून, १.२५ हेक्टर क्षेत्र हे खासगी आहे. या योजनेची एकूण किंमत १२ कोटी ७७ लक्ष असून, योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.

सिंचन क्षमता वाढीचा प्रयत्न

सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, विविध योजनांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यापैकी येवला तालुक्यातील महत्त्वपूर्ण योजना असलेल्या देवना साठवण तलाव योजनेसाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

The post देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार appeared first on पुढारी.