देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

गावठी दारू

देवळा :  देवळा पोलिसांनी खर्डे तालुक्यातील देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर छापा टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. शुक्रवारी (दि. २) पोलिसांनी ही कारवाई केली.  २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैद्य गावठी दारू विक्री बंद करण्याचा एकमुखी ठराव मंजूर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.

देवळा येथे मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारू तयार होत होती आणि अनेक तरुण स्वस्त दारू पिण्याच्या व्यसनाधीन होत होते. या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि काही व्यसनी तर मृत्युमुखीही पडले आहेत. महिला वर्गाकडून या दारूबंदीची वारंवार मागणी होत होती.

मागील काळात अशा प्रकारची तात्पुरती कारवाई होत होती पण ठोस निर्णय होत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पुन्हा गावठी दारूबंदीचा निर्णय झाला होता. तरीही हा व्यवसाय सुरूच असल्यामुळे निर्णय फक्त कागदोपत्रीच राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. २  स्थानिक पोलीस पाटील आणि पोलीस मित्र यांच्या मदतीने देवळा पोलिसांनी याठिकाणी छापा मारून अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईमुळे दारू विक्रेते आणि तळीराम यांच्यात खळबळ उडाली आहे. महिला वर्गाकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे आणि अशी कारवाई पुढेही सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गावठी दारू विक्री आणि व्यसन यावर नियंत्रण येण्यास मदत होईल अशी आशा आहे.

हेही वाचा :

The post देवळा येथे अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त appeared first on पुढारी.