उत्तम साहित्यात समाजसेवेचे मूल्य : सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन

अमळनेर : पुढारी वृत्तसेवा- काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना. धो. महानोर, अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात कसे वागावे याची शिकवणूक मिळते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अमळनेर मराठी वाड्.मय मंडळ यांच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी (पुज्य साने गुरूजी साहित्य नगरी) येथे त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक अशोक जैन, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डाॅ. अविनाश जोशी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, समन्वयक नरेंद्र पाठक, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाल्या, तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. मात्र, राजकारणी, समाजकारणी यांनी प्रेरणादेण्याचे काम साहित्य करते. तुमचं मन शुध्द असेल तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात. त्यामुळे साहत्याचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे असे त्या म्हणाल्या. प्रारंभी मान्यवराच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी महापुरूष तसेच साहित्यिकांची वेशभूषा करत लक्ष वेधले. दिंडी मार्गावर काढलेल्या रांगोळी तसेच पतका यामुळे साहित्यनगरी दुमदुमून गेली होती.

The post उत्तम साहित्यात समाजसेवेचे मूल्य : सुमित्रा महाजन appeared first on पुढारी.