धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

वाहन चोरट्यांनी शहर, जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ

धुळे: पुढारी वृत्तसेवा

बनावट चावीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून चौकशीत आणखी गाड्या हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धुळे शहरातील पश्चिम हुडको परिसरातील साईबाबा मंदिराजवळून एम एच 18 एए 2209 क्रमांकाची पिकअप वाहन चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि धीरज महाजन यांनी समांतररित्या सुरू केला. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे येथे राहणारा अरबाज शेख साजिद मणियार व शाहरुख अब्बास खाटीक या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली असता वाहनचोरीचे रॅकेट उघड झाले. दोघाही आरोपींनी बनावट चावीच्या माध्यमातून वाहन चोरी केले असल्याची कबुली दिली. धुळे शहरातील ज्योती चित्र मंदिर जवळ लपवलेली पिकअप वाहन त्यांनी बाहेर काढून दिली. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातून देखील दोघांनी एम एच 28 व्ही 62 45 क्रमांकाची क्रूजर वाहन चोरल्याची माहिती दिली. हे वाहन देखील धुळ्याच्या संत नरहरी नगर येथून हस्तगत करण्यात आले आहे. दोन्ही चोरट्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी चोऱ्यांची माहिती मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.