धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 7 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणारा सुंदर माझा दवाखाना उपक्रम धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या.

सुंदर माझा दवाखाना व वाढता कोविड संसर्गबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच आरोग्य संस्थांमध्ये जनतेने आरोग्य सुविधा घेण्यासाठी मोठ्या संख्येने यावे याकरीता सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोगय केंद्र, ग्रामीण रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयापर्यंत, वैद्यकीय महाविद्यालयासह स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वाढता कोविड संसर्ग लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर आगामी सण, उत्सवा दरम्यान नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या उपक्रमाची माहिती देतांना डॉ. संतोष नवले म्हणाले, या उपक्रमांतर्गत सर्व आरोग्य यंत्रणांमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांचा आंर्तबाहय परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. शक्य असल्यास रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदान, सीएसआर फंड, जिल्हा परिषद शेष निधी, एनजीओची मदत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोविड संसर्गाबाबतची सध्याची परिस्थिती तसेच उपलब्ध साधनसामुग्री याबाबतचे सादरीकरण अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील यांनी केले.

हेही वाचा : 

The post धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.