धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकात बांधण्यात आलेले वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील चबुतरा अखेर सहठेकेदाराने आज पहाटेपासून काढण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकांमध्ये हा चबुतरा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित सह ठेकेदाराला हा चबुतरा स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा चबुतरा काढून घेण्यास सुरुवात झाली आहे.

धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकाचे सुशोभीकरण करून यात चबुतरा तयार करण्यात आला होता. या चौकाला टिपू सुलतान यांचे नामकरण देखील करण्यात आले होते. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना धुळ्यात आक्रमक झाल्या. भारतीय जनता पार्टीने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन चबुतरा आमदार फारुख शाह यांच्या सहकार्याने उभारण्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून हा चबुतरा तोडण्याची मागणी केली होती. दरम्यान साक्री रोड येथील मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी 10 जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देऊन यात वडजाई रोडवरील हा चबुतरा तोडण्याची मागणी लावून धरली. दरम्यान काल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर महापौर प्रतिभाताई चौधरी, स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत या स्मारक संदर्भात आयुक्त देविदास टेकाळे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या सहकार्यानेच हा चबुतरा उभारला गेल्याचा आरोप केला. या चौकाचे टिपू सुलतान नामकरण करताना महानगरपालिकेच्या कोणत्याही सभेत ठराव केला गेला नाही. मात्र तरीही बेकायदेशीरपणे चौकाचे नामकरण केले गेल्याचा आरोप यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनामध्ये काल सायंकाळी उशिरापर्यंत एक बैठक झाली. यात पोलीस प्रशासनासह महानगरपालिका आणि बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेत महानगरपालिकेकडून हा चबुतरा  उभारण्यासाठी तसेच चौक नामकरणासाठी कोणतीही परवानगी दिली गेली नसल्याचे स्पष्ट झाले. तर बांधकाम विभागाने देखील चबुतरा उभारण्यासाठी निधी दिला नसल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान वडजाई रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधीला देखील पाचारण करण्यात आले. यात चबुतरा हा सह ठेकेदाराच्या मदतीने बांधला गेल्याची बाब निदर्शनास आल्याने या सह ठेकेदाराला स्वतःहून बांधकाम काढून घेण्याचे आदेश देण्यात आले. हा चौक वर्दळीचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची देखील गर्दी राहते. त्याचप्रमाणे मुंबई आग्रा महामार्गाकडे जवळचा रस्ता म्हणून या चौकातूनच अनेक वाहने जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होऊ नये, तसेच गर्दी गोळा होऊन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी  बांधकाम रात्री उशिरा काढण्यास सुरुवात करण्यात आली. आज पहाटे सहा वाजेपर्यंत बांधकाम काढणे सुरू होते. दरम्यान उर्वरित बांधकाम येत्या दोन दिवसात पूर्णपणे काढण्यात येणार आहे या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.