धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

धुळे वंचित बहुजन आघाडी,www.pudhari.news
धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत वंचित आघाडीला फटका बसला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुर्र रहमान यांचा अर्ज लाभाच्या पदाच्या कारणावरून अवैध करण्यात आला आहे. एकूण 30 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे वैध ठरले तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज येथील नवीन नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी धुळे लोकसभेचे मुख्य निवडणूक निरीक्षक (सामान्य) पूर्ण चन्द्र किशन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार पंकज पवार यांचेसह नामनिर्देशनपत्र दाखल केलेले उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, प्रस्तावक आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या समोर दाखल अर्जांची छाननी करण्यात आली.धुळे लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या एकूण 30 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे वैध ठरले तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात वंचित बहुजन आघाडीचे आघाडीला फटका बसला आहे. आघाडीचे उमेदवार अब्दुर्र रहमान यांचा अर्ज बाद ठरला. या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देत असताना निवडणूक यंत्रणेने त्यांच्याकडे असलेल्या लाभाच्या पदा संदर्भातील कारणावरून अर्ज बाद केल्याचे म्हटले आहे. सध्या आपण कोणत्याही लाभाच्या पदावर नसून कोणताही वेतन स्वरूपाचा लाभ घेत नसल्याचा दावा त्यांनी केला. या व्यतिरिक्त उमेदवारी अर्ज परिपूर्ण असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यांचा सेवानिवृत्तीचा विषय वेगळा असून ही बाब न्यायप्रविष्ट आहे. या संदर्भातील सुनावणीसाठी केंद्राने वेळ काढू पणा केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. आता अर्ज बाद झालेल्या निकालाची तज्ञांकडून अवलोकन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नामनिर्देशपत्र वैध ठरलेले उमेदवार

 जहुर अहमद (बहुजन समाज पार्टी), बच्छाव शोभा दिनेश (इंडियन नॅशनल काँग्रेस), भामरे सुभाष रामराव (भारतीय जनता पार्टी), नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पार्टी), पाटील शिवाजी नाथु (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मुकिमुद्दीन शेख (भीम सेना), शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया), अब्दुल हफीज अब्दुल हक (अपक्ष), आनंदसिंग ठोके (अपक्ष), इरफान मो इसहाक (अपक्ष), भरत बाबुराव जाधव (अपक्ष), भामरे राहुल सुभाष (अपक्ष), मलय प्रकाश पाटील (अपक्ष), मोहम्मद आमिन मोहम्मद फारुक (अपक्ष), मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष), राजेश उत्तमचंद आलीझाड (अपक्ष), राजेंद्र जगन्नाथ चव्हाण (अपक्ष), लहानु महादु साबळे (अपक्ष), शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख (अपक्ष), सचिन उमाजी निकम (अपक्ष), सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर (अपक्ष), संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष) या 22 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.

नामनिर्देशपत्र अवैध ठरलेले उमेदवार

 अब्दुल रहमान (वंचित बहुजन आघाडी), अशोक शंकर पाटील (अपक्ष), दिनेश मोतिराम बच्छाव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)  राहुल विलास पगारे (अपक्ष), अनिल शांताराम तेजा (अपक्ष), वर्षा तुषार गांगुर्डे (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया), आयशा सिद्दीक रऊफ खान (अपक्ष), सुषमा जगदीश मराठे (अपक्ष) या 8 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विविध कारणांनी अवैध ठरले आहेत.
वैध ठरलेल्या उमेदवारांना सोमवार, 6 मे, 2024 पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार असल्याचेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.
हेही वाचा –