वसुबारस विशेष : मालेगावात ‘पहिली रोटी गाय की’ उपक्रम

पहिली रोटी गाय की उपक्रम,www.pudhari.news

सादिक शेख : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात यंदा जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने जनावरांसाठीच्या हिरवा चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तर भारताच्या धर्तीवर मालेगावातील पांझरापोळतर्फे ‘पहिली रोटी गाय की’ हा उपक्रम राबविला जात आहे. या रोटी उपक्रमाला शहरातून नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. शहरातून गायींसाठी रोज तीनशे ते चारशे किलो रोटी जमा होत आहे.

देशात हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यात एक रोटी गायी साठी हा उपक्रम गेल्या तीन दशकांपासून राबविला जात आहे. शहरात येथील पांझरापोळचे अध्यक्ष राजेंद्रसिंग शास्त्री यांनी चार्‍याची टंचाई लक्षात घेता जून महिन्यापासून हा उपक्रम सुरू केला आहे. गोशाळेच्या शहरासह तालुक्यात दाभाडी व कौळाणे असे मिळून तीन शाखा आहेत. या तिन्ही शाखेत जवळपास एक हजार 200 गायी आहेत. शहरातील शिवतिर्थाजवळील पांझरापोळला दररोज हिरवा चारा 8 ते 9 टन लागतो तर कोरडा चारा 4 टन लागतो. चार्‍याची कमतरता भागविण्यासाठी शहरातील वर्धमाननगर, ज्योतीनगर, संगमेश्‍वर, सोयगाव, सटाणानाका, कॅम्प, कलेक्टरपट्टा, बारा बंगला यासह विविध भागात जाऊन रोटी वाहन रोटी संकलन करण्याचे काम करीत आहे. रोटी वाहनात नागरिक रोटी, गुळ, गहू, चारा टाकतात.

रोटी संकलनासाठी वाहन…

येथे रोटी संकलन करण्यासाठी तहाराबाद येथील सुरेश पवार यांनी गोशाळेला चारचाकी वाहन दिले आहे. त्या वाहनातून रोज विविध भागात रोटी संकलन केले जाते. येथे रोटी संकलनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोशाळेकडे एक वाहन असल्याने बर्‍याच भागात वाहन पोहोचू शकत नसल्याचे शास्त्री यांनी सांगितले. रोटी संकलन वाहनाला दान पेटी लावली आहे. या दानपेटीतून आलेल्या पैशांतूनच डिझेल व वाहन चालकाचा खर्च भागविला जातो.

गायींच्या दूधातही झालीय वाढ

सध्या येथील अनेक गोशाळेत गाईंना कमी प्रमाणात हिरवाचारा मिळत आहे. गोशाळेत गायी ला ढेप मिळत नसल्याने रोटी व गूळ हे न्यूट्रिशीयनचे काम करीत आहे. गूळ व रोटी मुळे गाईच्या दुधातही वाढ होते. शिवतिर्थ जवळील गोशाळेत सकाळ व संध्याकाळी रोज एकशे सत्तर लिटर दुध निघते. कुकाणे येथील गोशाळेत 100 लिटर दुध निघते. या दूधाची साठ रुपये लिटर प्रमाणे विक्री होते. त्याच बरोबर येथे गोशाळेतर्फे येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुमारे साठ लिटर गौमूत्र मोफत वाटप केले जातात.

शासनातर्फे गोशाळेला कुठलेही अनुदान मिळत नाही. यासाठी दानशुरांनी गोमातेसाठी चारा व रोटी संकलन करण्यासाठीच्या वाहनासाठी मदत करावी. जेणे करुन रोटी संकलनाला ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकेल.
– राजेंद्रसिंग शास्त्री
अध्यक्ष, पंजारापोळ गौशाळा, शिवतीर्थ, मालेगाव.

हेही वाचा :

The post वसुबारस विशेष : मालेगावात 'पहिली रोटी गाय की' उपक्रम appeared first on पुढारी.