नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण

गोदावरी नाशिक,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रूरकीच्या निर्देशांनंतर नमामि गोदा प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून, महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा २७८० कोटींचा सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या पंधरवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेने राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे. (Namami Goda )

२०२७-२८मध्ये नाशकात सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालिन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. सल्लागार संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत केंद्राला सादर केला होता. या योजनेत नवीन मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीबरोबरच अस्तित्वातील जुन्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण प्रस्तावित आहे. दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत नाशिक शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव देखील महापालिकेने शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावांबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेचे संचालक अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांना पाचारण करण्यात आले होते. नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या दोन्ही प्रस्तावांतील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते. आयआयटी रुरकीने देखील काही सुधारणा सूचविल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण करत येत्या पंधरवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करण्याची तयारी केली आहे.

असा आहे नमामि गोदा प्रकल्प… (Namami Goda)

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, आडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलिनिससारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाईनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.

असा होणार खर्च…

केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्यावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरण करणे- ३९८.१८ कोटी.

जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे- ९२७.३४ कोटी.

नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी- ६२२.०९ कोटी.

नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.

कामटवाडे, मखमलाबादच्या एसटीपीसाठी जागेची अडचण

या प्रकल्पांतर्गत तपोवन व आगरटाकळी येथे दोन मलनिस्सारण प्रकल्प(एसटीपी) नव्याने उभारले जाणार आहेत. कामटवाडे व मखमलाबाद येथेही नवीन मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याची योजना आहे. मात्र या ठिकाणी महापालिकेला अद्याप जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही. प्रस्तावित जागेच्या संपादनासाठी भूसंपादन विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येकी ४ ते ४.५ एकर जागेची प्रकल्प उभारणीसाठी आवश्यकता आहे.

हेही वाचा :

The post नमामि गोदा' प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.