नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी देवळा शहरात जनजागृती

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या शरीराला हानिकारक असलेल्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे ह्या जनजागृती साठी देवळा शहरात व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.

नागरिक मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाले असून, यात बहुतांश तरुण वर्ग गुटखा, सिगारेट, दारू तसेच सुगंधी तंबाखूचे सेवन करतांना आढळून येत आहेत. यामुळे अनके जणांना आजाराची व्याधी लागून मृत्युमुखी पडले आहेत. गुटखा विक्री बंद असतांना देखील शहरासह खेड्यापाड्यात आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री सुरु आहे. काही ठिकाणी बनावट दारू देखील मिळत असल्याचे समजते. ह्या सर्व व्यवसायांवर तात्पुरती कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यसनापायी अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या व्यसनांपासून दूर राहावे व नागरिकांनी निरोगी आयुष्य जगावे, यासाठी देवळा शहरात “तुमच्या कुटूंबाला तुम्ही हवे आहात, त्याचा विचार करा आणि गुटखा सोडा या आशयाचे होर्डिंग लावून व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.

The post नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी देवळा शहरात जनजागृती appeared first on पुढारी.