नाशकात ‘झिका’चा शिरकाव, २४ वर्षीय युवकास लागण

Zika Virus

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– येथे ‘झिका’ विषाणूची एन्ट्री झाली आहे. शहरातील भारतनगर परिसरातील २४ वर्षीय युवकास ‘झिका’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णाच्या लघवीच्या नमुन्यांच्या तपासणीत झिकाचा (Nashik Zika Virus) विषाणू आढळल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा गर्भवती महिलांना अधिक धोका असल्याने गर्भवती महिलांचे रक्तनमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली आहे.

शहरातील भारतनगर भागातील युवकाला या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर परिसरातील बड्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचे रक्तलघवीचे नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यात लघवीच्या नमुन्यांमध्ये झिकाचा व्हायरस आढळला. सद्यस्थितीत या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र परिसरात लागण होऊ नये यासाठी वैद्यकीय विभागाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. डेंग्यूप्रमाणेच हा आजार डासांपासून होतो. हा एक विषाणूजन्य आजार आहे. तो मुख्यतः एडीस डासांद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणुमुळे होतो. विशेष म्हणजे हा डास केवळ दिवसा चावतो. त्याद्वारे या आजाराची लागण होते. झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंग्यूसारखीच असतात. ताप येणे, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी यासारखी लक्षणे या आजारात आढळतात. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. (Nashik Zika Virus)

गर्भवती महिलांचा शोध

‘झिका’ विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे शिशू मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकतो. गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाचा डोक्याचा घेर कमी होतो. भारतनगर येथे झिका रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आदींना गर्भवती महिलांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यात पाच गर्भवती महिला आढळल्या.

झिकाची लक्षणे आढळल्यास… (Nashik Zika Virus)

* रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.

* पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे.

* ताप आल्यास पॅरासिटॅमॉल औषध वापरावे.

* ऑस्पिरिन प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

* डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.

या आजाराची लागण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी मोहीम राबविली जात आहे. गर्भवतींना लागण होण्याचा धोका अधिक असल्याने मोहिमेत आढळलेल्या पाच गर्भवती महिलांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.

——-०——–

हेही वाचा :

The post नाशकात 'झिका'चा शिरकाव, २४ वर्षीय युवकास लागण appeared first on पुढारी.