नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित

राहुल गांधी www.pudhari.news

चांदवड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) सकाळी ८.३० वाजता चांदवडला पोहोचणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सभापती संजय जाधव यांनी दिली. या सभास्थळाची पाहणी सोमवारी (दि. ११) नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी करीत आवश्यक त्या सूचना सबंधित यंत्रणेला दिल्या. (Bharat Jodo Nyay Yatra)

चांदवड : बाजार समितीत खासदार राहुल गांधी यांच्या होणाऱ्या जाहीर सभास्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती. समवेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सभापती संजय जाधव. (छाया : सुनील थोरे)

येथे होणाऱ्या खासदार राहुल गांधींच्या सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (श. प) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेचे जंगी स्वागत करण्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, चांदवड कृउबाचे सभापती संजय जाधव यांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत राहुल गांधी यांच्या सभेस जास्तीत जास्त नागरिक यावे, यासाठी गटनिहाय गाठीभेटीचे नियोजन करण्यात आले आहे. (Bharat Jodo Nyay Yatra)

चांदवडच्या जाहीर सभेत खा. राहुल गांधी हे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले कांदा, द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीन, ऊस पिकांचे पडलेले बाजारभाव यावर लक्ष वेधणार आहे. तसेच आदिवासी, गोरगरीब जनता, नोकरदारांचे प्रलंबित प्रश्न, तरुणांची बेरोजगारी, देशात व राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग, महागाई वाढल्याने होणारे सर्वसामान्यांचे हाल यावर प्रकाश टाकणार असल्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले.

सभेपूर्वी आढावा बैठक (Bharat Jodo Nyay Yatra)

खासदार राहुल गांधी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर येथील बाजार समितीच्या सभागृहात पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यात मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन, प्रांत कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सभापती संजय जाधव आदी उपस्थित होते.


हेही वाचा :

The post नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित appeared first on पुढारी.