नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक‌्युध्द

प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत आता वादविवाद रंगल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय, असे वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रह नाही तर हट्ट सुद्धा आहे, ही जागा आम्ही मिळवणारच, किंबहुना हा आता आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष पेटला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर महायुतीकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. त्यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये आता वादविवाद रंगण्यास सुरूवात झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिक जागेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नाशिकमध्ये विद्यमान खासदार हे शिवसेनेचा आहे. त्यामुळे जागावाटपात आतापर्यंतच्या विद्यमान खासदारांच्या जागेबाबत एखादा जागेवर थोडी तडजोड केली आणि एखाद-दुसरा खासदार कमी झाला तर त्यांनी ते मान्य केले पाहिजे आणि भाजपनेही ते मान्य केल्यास आम्हाला बरे वाटेल. नाशिकची जागा नक्कीच आम्ही मागत असून त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत विषय आहे. तसेच त्याबद्दलनंतर ठरवल्या जाईल, सर्वप्रथम ही जागा आम्हाला सुटली पाहिजे. अर्थात काही लोकं जागा कुणाची हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात. कार्यक्रम करून टाकू अशा धमक्या देतात, अशी टीकाही पटेल यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

यावर शिंदे गटाचे शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट म्हणाले की, नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही तर हट्टसुद्धा आहे. त्यामुळे आम्ही नाशिकची जागा मिळवणारच, यामध्ये शंका नाही. हा आता आमच्या सुध्दा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. शिंदे साहेबांनी सगळ्या जागा सोडायचे मान्य केले का? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही विनंती करतो की, जास्त आग्रह न करता ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे. त्या जागा आम्हालाच मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

नाशिकची जागा नक्कीच आम्ही मागत असून त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत विषय आहे. त्याबद्दल नंतर ठरवले जाईल. – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी अजित पवार गट

 

नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही तर हट्टसुद्धा आहे. त्यामुळे आम्ही नाशिकची जागा मिळवणारच, यामध्ये शंका नाही. हा आता आमच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. – संजय शिरसाट, प्रवक्ते, शिवसेना शिंदे गट

हेही वाचा –

The post नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक‌्युध्द appeared first on पुढारी.