नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब

धोकादायक वाडे नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न एेरणीवर असतानादेखील महापालिका प्रशासन याबाबत गाफील असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील १ हजार १८६ धोकादायक वाडेधारकांना नोटीसा बजावल्या. मात्र, हा केवळ सोपस्कार असल्याचेच दिसून येत आहे. वाडेधारकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या नोटीसांना महत्त्व न देण्याची भूमिका घेतल्याने, महापालिकाही याकडे दुर्लक्ष करून आहे. अशात धाेकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

कोकणात मान्सून दाखल झाला असून, पुढील चार दिवसात तो राज्यभर सक्रीय होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशात शहरातील धोकादायक वाडे कोसळण्याची भिती व्यक्त केली जात असल्याने, या वाड्यांबाबत तत्काळ नियोजन करणे गरजेचे आहे. यापूर्वी वाडे ढासळण्याचे प्रकार समोर आले असून, त्यात जिवीतहानीही झाली आहे. अशात वाडे खाली करण्याबाबत महापालिकेने संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या. त्याचबरोबर वेळेत वाडे खाली न केल्यास संबंधितांचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा इशाराही दिला होता. परंतु वाडेधारकांनी महापालिकेच्या या नोटीसा अजिबातच थारा दिला नाही. आश्चर्य म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधल्याने, धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तत्कालिन आयुक्त रमेश पवार यांनी पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाडे रिकामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाकडे अधिकारी दुर्लक्ष करून आहेत. शिवाय सध्या महापालिकेला कोणी वाली नसल्याने, अधिकारीही याप्रश्नी फारसे गंभीर नसल्याचेच चित्र आहे. याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाला विचारणा केली असता, कारवाईचा अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना असल्याचे उत्तर दिले जात आहे. एकंदरीत धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोठी दुर्घटना समोर येण्यापूर्वी मनपा प्रशासनाने प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे.

काझी गढीकडे दुर्लक्ष

काझी गढी नाशिक

दरवर्षीप्रमाणे यंदाही काझी गढीचा मुद्दा एेरणीवर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात काझी गढीची माती ढासळत असल्याने, कढीच्या उपाययोजनांबाबत गंभीरतेने प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, मागील कित्येक वर्षांपासून काझी गढीचा मुद्दा जैसे थे असून, प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करून आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिकधील धोकादायक वाड्यांबाबत नोटिसांचा सोपस्कार, कारवाईची बोंब appeared first on पुढारी.