नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली

एचआयव्ही,www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

जनजागृतीसोबतच सुरक्षित शारीरिक संबंधाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची सरासरी संख्या घटली आहे. जिल्हा रुग्णालयातील एआरटी (अ‍ॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी) केंद्रावर नोंद झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येवरून ही माहिती समोर आली आहे. एआरटीत २०१५ मध्ये १०८२ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१७ पर्यंत सातत्याने रुग्णसंख्या हजारापेक्षा अधिक आढळून येत होती. मात्र, २०१८ नंतर ही संख्या सातत्याने हजाराच्या खाली नोंदविली जात आहे. व्यापक जनजागृती व बाधित रुग्णांच्या समुपदेशनामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले जाते.

ह्युमन इम्युनोडीफिशयन्सी व्हायरस (एचआयव्ही) हा मानवाच्या प्रतिकारशक्तीला नष्ट करतो. एचआयव्ही या विषाणूमूळे एड्स होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, अयोग्य प्रकारे निर्जंतुक केलेल्या सुया किंवा रुग्णालयीन उपकरणे एकमेकांसाठी वापरणे, असुरक्षित पद्धतीने रक्त चढविणे आणि एचआयव्हीबाधित मातेकडून तिच्या बाळाला एचआयव्हीची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही संक्रमणाचा धोका कायम असून, एडसमुक्त करणारे कोणतेही औषध अद्याप विकसित होऊ शकलेले नाही. जिल्ह्यात २०१५ मध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या १०८२ इतकी होती. पुढे २०१७ पर्यंत ती वाढतच गेली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एचआयव्हीबाधित झपाट्याने वाढू लागल्याने, यंत्रणाही धास्तावली होती.

दरम्यान, प्रशासनाने व्यापक जनजागृती व बाधित रुग्णांच्या समुपदेशनावर सर्वाधिक भर दिल्याने २०१८ पासून संख्या कमी हाेत गेली. कोरोना काळात तर त्यात कमालिची घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर येते. मात्र, संख्या कमी होत असली तरी, अजूनही ती समाधानकारक नसल्याने पुढच्या काळात देखील प्रशासनाला व्यापक जनजागृती करण्यावर भर द्यावा लागेल.

२०११ मध्ये १६८२ बाधित
२०१० मध्ये नाशिक जिल्ह्यात १५९८ एचआयव्ही बाधितांची नोंद झाल्यानंतर २०११ मध्ये त्यात भर पडली. या साली १६८२ रुग्ण आढळून आले. त्यानंतर २०१२ साली १३८५, २०१३ मद्ये १३६७ तर २०१४ साली १११८ एचआयव्ही बाधित आढळून आले.

कोरोना काळात संख्या कमी
कोरोना काळात म्हणजेच २०२० ते २०२२ या काळात एचआयव्ही बाधितांची संख्या कमी नोंदविली गेली. २०२० मध्ये ५६१, २०२१ मध्ये ७०६ तर २०२२ मध्ये ८१३ रुग्णांची नोंद झाली. २०२३ मध्ये मात्र दोनच महिन्यात १०५ रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

एचआयव्ही बाधितांची संख्या
वर्ष – संख्या
२०१५ – १०८२
२०१६ – १०९७
२०१७ – १०५८
२०१८ – ९९५
२०१९ – ९०३
२०२० – ५६१
२०२१ – ७०६
२०२२ – ८१३
२०२३ – १०५

हेही वाचा : 

The post नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली appeared first on पुढारी.