नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ 

येथील तांब्या-पितळाच्या भांड्यांना १९४० पासूनचा इतिहास आहे. नाशिकची द्राक्षे, चिवड्याबरोबरच भांडीबाजारही तेवढाच लोकप्रिय आहे. सराफ बाजाराजवळील हा भाग खास भांडीबाजार म्हणून ओळखला जातो. सध्याच्या काळात दुर्लक्षित झालेल्या तांब्या-पितळाच्या भांड्यांनी कात टाकत आता सोन्याचे दिवस आले आहेत.

पूर्वी तांब्या-पितळाची भांडी आवडीने वापरली जात होती. परंतु त्यांच्या स्वच्छतेसाठी घ्यावी लागणारी मेहनत ही तेवढीच त्रासदायक प्रक्रिया होती. पितळी भांड्यांना कल्हई करणे, तांब्याच्या भांड्यांना डाग पडणे, यामुळे ते नियमित स्वच्छ करावी लागतात. शिवाय ही भांडी वजनाने जड असतात. त्यामुळे लोकांचा कल स्टील, नॉनस्टिक, प्लास्टिक, ॲल्युमिनिमच्या भांड्याकडे अधिक वाढला होता. पूर्वी नाशिकमधून इतर शहरांमध्ये भांडी पुरवली जात होती. परंतु काळाच्या ओघात १९८०-८२ मध्ये स्टीलची भांडी आल्यानंतर तांब्या पितळीच्या भांड्यांचा खप अचानक कमी झाला.

वाढत्या आजारपणांमुळे आणि कोविड साथीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. काही काळातच ॲल्युमिनियम, नाॅनस्टिक, प्लास्टिक भांड्याचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात यायला लागले. २००२ पासून तांब्या-पितळीच्या भांड्यांच्या विक्रीने पुन्हा जोर पकडला. सध्या तर या भांड्यांना सोन्याचे दिवस आल्याने कारागिरांना हक्काचा रोजगार निर्माण झाला आहे. आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी आरोग्यास अधिक लाभदायी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी लोक खास तांब्याचे फिल्टर, मटके, बाटली, पिंप घ्यायला पसंती देतात.

पुणे : केमोथेरपीच्या दुष्परिणामांवर आयुर्वेदाची मात्रा

नाशिकच्या भांड्यांची खासियत

नाशिकचे नाव पितळासाठी प्रसिद्ध आहे. इतर गावांच्या तुलनेने नाशिकमधील भांड्यांचा दर्जा कुठेही मिळत नाही. तो दर्जा विक्रेत्यांनी आजही टिकवून ठेवला आहे. ही भांडी खास कारागिरांकडून घडवून घेतली जातात. प्लेन पत्र्याला आकार देऊन तो ठोकला जातो, भट्टीत टाकल्यानंतर त्याला पॉलिश केले जाते. दिवे, दिवटी बुधली, अभिषेक पात्र, देवांच्या मूर्ती, घंटी, समई, कढई, पातेले, घंगाळ यासारख्या भांड्यांची सर्वाधिक विक्री असते. केवळ पावसाळ्यात भांड्यांना फारशी मागणी नसते.

१९५५ पासून आमचे दुकान भांडी बाजारात आहे. या व्यवसायात आमची चाैथी पिढी सध्या काम करत आहे. आमच्याकडे १०८ प्रकारची भांडी असून त्यातही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इतर शहरांच्या तुलनेने नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांडी चांगल्या दर्जाची असतात. शिवाय मागील काही वर्षांपासून लोक आरोग्याच्या दृष्टीने अधिक सतर्क झाल्यामुळे तांब्या-पितळीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे.

-विवेक आंबेकर, विक्रेते

अर्धा तांब्याचा अर्धा पितळाचा तांब्या, डेग, हांडे, घंगाळ, कळशी ही भांडी पूर्वीपासूनच नाशिकमध्ये तयार व्हायची. भांडी बाजारात एकुण ११० दुकाने आहेत, तर शहरात ४५० ते ५०० दुकाने आहेत. कोट्यवधीची उलाढाल भांडी बाजारात होते. असोसिएशनचे ११८ सभासद असून समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

-मयुर काळे, अध्यक्ष, भांडी बाजार असोसिएशन

भांड्यांमधील गुंतवणूक ठरते फायदेशीर

तांब्याची भांडी ७५० रुपयापासून पुढे मिळतात. तर पितळीची भांडी ११०० रुपयांपासून पुढे किलोने मिळतात. हीच भांडी काही काळानंतर मोड म्हणून द्यायची म्हटल्यास अर्धी किंमत (भांड्यानुसार) मिळते. याउलट स्टीलची भांडी मोड म्हणून दिल्यास ४०० रुपयांच्या भांड्याची ४० रुपये मोड म्हणून गृहीत धरली जाते.

अधिक मासात अधिक मागणी

दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास शिवाय नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने बाहेर राज्यातून लोक पर्यटनासाठी आणि गंगेत स्थान करण्यासाठी येतात. तांबे शुद्ध धातू मानला जातो म्हणून नदीला, ब्राह्मणांना, जावयाला वाण देण्यासाठी या काळात तांब्याची भांडी अधिक खरेदी केली जातात. अधिक मासात सोन्या-चांदीची भांडी दिली जात असली, तरी तांब्याची वस्तू देण्याची पद्धत आहे. परिस्थितीनुसार लोक अधिक मासाच्या काळात तांब्याची छोटीशी वस्तू खरेदी करतात.

हेही वाचा :

The post नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस appeared first on पुढारी.