नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

जातपंचायत www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान, या मुलीची फारकत जातपंचायतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडितेचा पहिला पती दुसरा विवाह करू शकतो. मात्र, पीडितेने दुसरा विवाह केल्यास तिला पहिल्या पतीस 51 हजार रुपये द्यावे लागेल, असा धक्कादायक निकाल जातपंचायतीने दिल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.

टाकेदेवगाव (धारेचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) येथील 16 वर्षी अल्पवयीन मुलीचा गेल्या वर्षी शिरसाणे (सपर्‍याची वाडी) ता. इगतपुरी येथील मुलाशी विवाह झाला. मुलगी अल्पवयीन असल्याने शासकीय यंत्रणांनी हा विवाह रोखला होता. मात्र, संबंधितांनी त्याच रात्री मंदिरात जाऊन गुपचूप विवाह केला होता. यानंतर अल्पवयीन मुलगी दोन महिने सासरी वास्तव्यास होती. त्यानंतर सासरच्या मंडळीने तिला माहेरी पाठवले. या काळात ती गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीच्या घरच्यांनी मुलगी गर्भवती असल्याची माहिती तिच्या पतीला दिली. मात्र, पतीने तिला नांदविण्यास नकार दिला. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांत समझोता होऊ न शकल्याने हा विषय जातपंचायतीत गेला. जातपंचायतीने 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर निवाडा दिला असून, प्रतिज्ञापत्र व्हायरल झाले आहे. पीडित कुटुंबीयांच्या अशिक्षितपणाचा फायदा उचलला गेल्याचे निकालावरून समोर आले आहे. त्यामुळे जातपंचायतीकडून एकतर्फी निकाल देण्यात आला. पीडितेच्या नावे प्रतिज्ञापत्र तयार करून तिने फारकतीस संमती दर्शवत पतीला दुसरा विवाह करण्यास बिनशर्त मुभा दिली. मात्र, पीडितेने दुसरा विवाह केल्यास तिला पहिल्या पतीस लग्नासाठी झालेला 51 हजार रुपयांचा खर्च भरून देण्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. हे प्रतिज्ञापत्र सप्टेंबर महिन्यात जातपंचायतीच्या साक्षीने करण्यात आल्याची माहिती चांदगुडे यांनी दिली. दरम्यान, पीडितेने जिल्हा रुग्णालयात बाळास जन्म दिला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जातपंचायतीला मनाई केलेली असतानाही जिल्ह्यात जातपंचायतीकडून न्यायनिवाडे केले जात असल्याचे समोर येत आहे. विवाहानंतर मुलीची प्रसूतीनंतर परवड सुरू झाली असून, या जातपंचायतीवर कारवाई करावी, अशी मागणी चांदगुडे यांनी केली आहे.

घटनेस अनेक कांगोरे आहेत. तसेच जातपंचायतीने पीडितेचा घटस्फोट घडवून आणल्याचे दिसते. जातपंचायत बसवून न्यायनिवाडे करणे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे संबंधित जातपंचायतीवर गुन्हा दाखल करावा. – कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान.

हेही वाचा:

The post नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट appeared first on पुढारी.