नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचा तुडवडा

लसीकरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली असली, तरी अद्यापपर्यंत बऱ्याच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे पूर्ण डोस घेतले नसल्याची बाब समोर येत आहे. शहरातील अवघ्या १२ टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील कमी आहे. सध्या कोरानाच्या नवनव्या व्हेरिएंटचे संकट पुन्हा घोंगावत असल्याने, नागरिकांचा लसीकरणाकडे पुन्हा एकदा कल वाढत आहे. परंतु लशींअभावी महापालिकेच्या ३४ लसीकरण केंद्रांना टाळे ठोकल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट प्रचंड घातक ठरली होती. त्यामुळे या काळात लसीकरणावर सर्वाधिक भर दिला गेला. ओमायक्रॉन व्हायरसची तिसरी लाटही घातक ठरेल, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात होता. मात्र, लसीकरणामुळे ही लाट सौम्य ठरली. त्यानंतर कोरोना संपला असे गृहीत धरून अनेकांनी कोराेना प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. आता जगभरात पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागल्याने, अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्क दिसून येत आहेत. तर बूस्टर डोससाठीही अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आतापर्यंत शहरात दोन लाख ७६, हजार ४२ इतक्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २० लाख ३७ हजार ५७६ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. ४ हजार १०९ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अर्थात हा आकडा सरकारी असून, बळी गेलेल्यांची संख्या दुप्पट किंवा तिप्पटही असू शकते.

दरम्यान, नाशिकसह राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने, केंद्र व राज्य सरकारने ‘टेस्ट, ट्रेक आणि ट्रीट’ या त्रिसूत्रीचा वापर करण्यासह लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक शहर व परिसरातही गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात दररोज १० हून अधिक रुग्ण आढळत आहेत. चाचण्या वाढविल्यास हा आकडा मोठा होऊ शकतो. अशात लसीकरणावरही भर देण्याची गरज आहे. मात्र, लशींचा साठाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने, चिंता वाढली आहे.

१२ वर्षांहून अधिक वय असलेल्यांचे लसीकरण

(१५ लाख १२ हजार ५३३ नागरिकांपैकी)

पहिला डोस – १४ लाख १३ हजार ५४१ (९३.४६ टक्के)

दुसरा डोस – ११ लाख ५२ हजार ७६० (७६ टक्के)

बूस्टर डोस – १ लाख ६६ हजार ८७४ (१२ टक्के)

कोव्हॅक्सिनचे २६०० डोस मुदतबाह्य

कोव्हॅक्सिन लशीचे मार्च अखेरपर्यंत तब्बल २६०० डोस मुदतबाह्य झाल्याने, त्याची विल्हेवाट लावण्याची वेळ आरोग्य विभागावर आली. कोरोना संपला असे गृहीत धरून अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. परंतु रुग्ण वाढू लागल्याने आता लसीकरणाकडे कल वाढत आहे, पण लशीच उपलब्ध नाहीत. सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६ इतकी आहे.

लशींची मागणी

महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे ८० हजार लशींची मागणी केली आहे. त्यामध्ये ५० हजार कोव्हिशिल्ड, १५ हजार कोव्हॅक्सिन, तर १५ हजार कोर्बोव्हॅक्स लशींचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचा तुडवडा appeared first on पुढारी.