नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा

अमित शहा, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती, महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा नाशिकमध्ये धडाडणार आहेत. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नाशिकला १८ मे रोजी जाहीर सभा होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांसाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची नोंदणी करण्याचा अर्ज महायुतीकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडूनदेखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेकरिता मैदानाची नोंदणी करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकरिता शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे नाशिक व दिंडोरीच्या रणसंग्रामाला आता दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी निवडणुकीची तयारी मात्र राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या असून, उमेदवारांच्या समर्थनार्थ या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा होणार आहेत. नेत्यांच्या जाहीर सभांकरिता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला सर्वाधिक मागणी आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून आतापासूनच या मैदानाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुढील महिन्यात दि. १५ एप्रिल रोजी नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून, त्यासाठी कान्हेरे मैदान मिळावे, याकरिता मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा दि. १६ मे रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा दि. १७ मे रोजी, तर १८ मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार असून, त्यासाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी अर्ज दाखल केला आहे. (Lok Sabha Election 2024)

जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी

निवडणूक काळात होणाऱ्या या जाहीर सभा तसेच मेळाव्यांसाठी शहरातील मैदाने उपलब्ध होण्याकरिता मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो. या दाखल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परवानगीसाठी सादर केला जातो. यानंतर सभेकरता परवानगी दिली जाते.

हेही वाचा –

The post नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा appeared first on पुढारी.