नाशिकमध्ये परवाना नुतनीकरणाअभावी ८० रुग्णालये अनधिकृत

रुग्णालये,www.pudhari.news

नाशिक : आसिफ सय्यद

मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ अन्वये महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, प्रसुतिगृहे व नर्सिंग होम चालकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून अधिकृतरित्या व्यवसाय परवाना घेणे व निर्धारीत कालावधीनंतर या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक असताना शहरातील तब्बल ८० रुग्णालये परवाना नुतनीकरणाअभावी अनधिकृत ठरली आहेत. विशेष म्हणजे शहरात तब्बल दहा रुग्णालयांनी तर महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता रुग्णालये सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. परवाना नुतनीकरण व नोंदणीसाठी वारंवार सूचनापत्र देऊनही सबंधित रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेने या रुग्णालय चालकांना नोटीसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik Hospitals)

मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ अन्वये महापालिका कार्यक्षत्रातील रुग्णालये, प्रसुतिगृहे, नर्सिग होमला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे तसेच निर्धारीत कालावधीनंतर परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. २०१८मध्ये तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत ज्या खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडे नोंदणी व परवाना घेतला नसेल अशा रुग्णालयांना टाळे ठोकण्याची व रुग्णालय चालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. कालांतराने त्यात शासनाने हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण निवळले. या घटनेला पाच वर्षे उलटल्यानंतरही रुग्णालयांना नोंदणी प्रमाणपत्र मिळवताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात अनेक परिचारकांची नोंदणी संपुष्टात आली. आता त्यांना नवीन नोंदणी आवश्यक असून ही नोंदणी होत नसल्यामुळे त्याचे प्रमाणपत्र रुग्णालय नोंदणीसाठी सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यात प्रदुषण नियंत्रण मंडळाचा दाखला आणण्याची बाब डोकेदुखी ठरत आहे. नगररचना, अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला, इलेक्ट्रीक आॉडीटचा अहवाल नसल्यामुळे अनेक रुग्णालयांना परवाना नुतनीकरण करता आलेले नाही. महापालिका हद्दीत ६०२ रुग्णालये, प्रसुतिगृहे, नर्सिंगहोम्स आहेत. त्यापैकी ५२२ रुग्णालये, प्रसुतिगृहे व नर्सिंगहोम्स चालकांनी महापालिकेकडे रितसर अर्ज करत परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र ३८ रुग्णालयांचे परवाना नुतनीकरणाचे अर्ज महापालिकेकडे कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. तर ४२ रुग्णालयांनी सूचनापत्रे मिळून देखील परवाना नुतनीकरणासाठी कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे या ८० रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या परवान्याशिवाय चालविली जात असलेली ही रुग्णालये अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. (Nashik Hospitals)

परवाना नुतनीकरण न होण्याची कारणे 

प्रामुख्याने परिचारिकांची नोंदणी प्रमाणपत्र नसणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचा दाखला, अग्निशमन व नगररचना विभागाकडील ना हरकत दाखला नसने, जादा बांधकामामुळे नगरचना विभागाकडील पुर्णत्वाचा दाखला न मिळणे, जुन्या इमारतीत अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना नसणे, आदी कारणांमुळे रुग्णालयांचे परवाना नुतनीकरण रखडले आहेत.

लवकरच आॉनलाईन प्रक्रिया

रुग्णालयांच्या परवाना नुतनीकरणाची क्लिष्ट प्रक्रिया सोपी सुटसुटीत व्हावी व या प्रक्रियेला वेग यावा यासाठी परवाना नुतनीकरणासाठी शासनाच्या आरोग्य सेवा विभागातर्फे स्वतंत्र वेबसाईट तयार केली जात आहे. रुग्णालय चालकांना आॉनलाईन नोंदणी व परवाना नुतनीकरणाची सुविधा याद्वारे उपलब्ध होणार आहे. रुग्णालय नोंदणी व परवाना नुतनीकरणासाठी लागणारा विलंब याद्वारे टाळता येणार आहे.

दर्शनी भागात दरपत्रक बंधनकारक

महाराष्ट्र शुषृश्रा अधिनियम सुधारीत २०२१ नुसार खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात खर्चाचे दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक आहे. मात्र काही रुग्णालयांकडून या नियमांची पायमल्ली केली जात असल्याच्या तक्रारी वैद्यकीय विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशा रुग्णालयांची तपासणी करून नोटीसा दिल्या जाणार आहेत. सनद आणि उपचार खर्चाची माहिती न दर्शनी भागात न लावणाऱ्या रूग्णालयांची नोंदणी व परवाना रद्द केला जाणार आहे.

अशी आहे आकडेवारी-

महापालिका हद्दीतील एकूण रुग्णालये- ६०२

परवाना नुतनीकरण झालेली रुग्णालये- ५२२

परवान्यासाठी अर्ज प्रलंबित- ३८

परवान्यासाठी अर्जही न केलेली- ४२

६०२ रुग्णालयांची नोंदणी अपेक्षित असून त्यापैकी ५२२ रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. ८० रुग्णालयांची नोंदणी बाकी असल्यामुळे सात दिवसात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस त्यांना दिली जाणार आहे.

– डॉ. प्रशांत शेटे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मनपा.

 

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये परवाना नुतनीकरणाअभावी ८० रुग्णालये अनधिकृत appeared first on पुढारी.