नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकरभरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकरभतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली आहे. (Nashik Municipal Recruitment)

नाशिक महापालिकेची आठ वर्षांपूर्वी ‘क’ संवर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली असली, तरी महापालिकेचे मंजूर आस्थापना परिशिष्ट पूर्वीच्या ‘क’ संवर्गानुसार आहे. त्यानुसार महापालिकेत ७,०९२ पदे मंजूर असली तरी, सध्या यातील तीन हजार पदे ही सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या नवीन आकृतिबंधाची तयारी पालिकेकडून सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना काळात राज्यशासनाने क संवर्गातील परिशिष्टानुसार, तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय विभागांच्या ७०६ पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली होती. शासन निर्देशांनुसार महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएसला काम देण्यात आले आहे. ब ते ड संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाऊ शकते. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता, उर्वरित ६२४ पदांमधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळली जाणार आहे. त्यामुळे एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी महापालिका आणि टीसीएसमध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भरती केली जाणाऱ्या २६ संवर्गांतील ५८७ पदांकरिता आरक्षण निश्चितीही करण्यात आली आहे. यात जातिनिहाय आरक्षित पदे, पदवीधर, दिव्यांग, क्रीडा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी राखीव पदांची निश्चिती करण्यात आली असून, त्यानुसार पदभरती केली जाणार आहे. (Nashik Municipal Recruitment)

अर्जासाठी आॉनलाइन सुविधा (Nashik Municipal Recruitment)

महापालिकेतील या नोकरभरतीसाठी टीसीएच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी वेबसाइटचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसकडून प्रशासनाला येत्या दोन-तीन दिवसांत सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमदेवारांना निर्धारित मुदत दिली जाईल. या मुदतीनंतर संवर्गनिहाय पद भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल.

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.