नाशिकमध्ये विचित्र हवामान, दिवसा उष्मा, रात्री थंडीचा कडाका

नाशिक हवामान www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधील पश्चिमी वाऱ्यांचा झंझावात कायम असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. हवेतील गारवा महाशिवरात्रीपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Nashik Weather)

गेल्या आठवड्याच्या प्रारंभी राज्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या. परंतु, दरम्यानच्या काळात उत्तर भारतातील पश्चिमी झंजावाताची साखळी कायम असून, त्यात मंगळवारी (दि. ५) अजून एका पश्चिमी झंझावाताने प्रवेश केला आहे. त्यामुळे अचानक गारठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील कमाल व किमान तापमानांत मोठी घसरण झाली आहे. त्यातून नाशिक जिल्हाही सुटलेला नाही. (Nashik Weather)

नाशिक शहरात दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली. पारा थेट १०.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी निफाडचा पारादेखील ६.६ अंशांवर स्थिरावला आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे दिवसभर उन्हाचा चटका अन‌् सायंकाळनंतर थंडीचा कडाका जाणवत आहे. पहाटेदेखील थंड वाऱ्यांचा वेग अधिक असून वाढत्या थंडीमूळे नागरिक गारठले आहेत.

शुक्रवारपर्यंत हवेत गारवा (Nashik Weather)

राज्यात सध्या विदर्भ वगळता उर्वरित सर्व भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पश्चिमी झंझावाताची साखळी अूजनही कायम असल्याने शुक्रवार (दि. ८)पर्यंत हवेतील गारवा कायम राहील. त्यानंतर किमान व कमाल तापमानाच्या पाऱ्यात हळूहळू वाढ होत जाईल.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये विचित्र हवामान, दिवसा उष्मा, रात्री थंडीचा कडाका appeared first on पुढारी.