नाशिकमध्ये साकारणार वनराई, 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी

वनराई,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या वन विभागाने शहरातील बॉश उद्योग समूह आणि आपले पर्यावरण ही संस्था यांना नाशिक शहरातील म्हसरूळ येथील 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी दिली आहे. यामुळे शहरात वनराई विकसित होण्यास मदत होणार आहे. बॉश, आपले पर्यावरण संस्था व वनविभाग यांच्या त्रिपक्षीय करारानुसार या 20 हेक्टर जागेवर 31088 रोपांची लागवड केली जाणार आहे. यामुळे नाशिक शहराच्या बाजूला वनक्षेत्र विकसित होणार आहे.

राज्य शासनाने काही महीण्यांपूर्वी अवनत वनक्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी औद्योगिक व सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्याचे धोरण निश्चित केले होते. या धोरणानुसार, शहरातील म्हसरूळ परिसरात वृक्षलागवडीसाठी वनविभाग सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या बॉश लिमिटेड या उद्योग समूहाची मदत घेणार आहे. बॉश उद्योग समूहाला परवानगी देताना वन विभागाने आपले पर्यावरण या संस्थेसोबत जोडून दिले आहे. आपले पर्यावरण ही संस्था शहरात अनेक ठिकाणी वृक्षलागवड करत वनराई वाढवण्याचे काम करत आहे. त्यामुळे आता वन विभाग, बॉश उद्योग समूह आणि आपले पर्यावरण या तिघांच्या एकत्रिकरणाने शहराच्या एका बाजूस वनराई होणार आहे.

म्हसरूळ येथील 20 हेक्टर जागेपैकी 19.5 हेक्टर जागेत प्रतिहेक्टरवर 825 रोपे लागवड करायची आहेत व उर्वरित अर्ध्या हेक्टरमध्ये 15 हजार रोपे लावायचे आहेत. एकूण 20 हेक्टरवर मिळून 31 हजार 088 वृक्षलागवड होणार आहे. या दोन्ही संस्थांनी लावलेल्या रोपांची सात वर्षे देखभाल करायची आहे. तसेच या वृक्षलागवडीचा व त्याच्या संरक्षण-वाढीचा खर्च बॉश व आपले पर्यावरण या संस्थेने करायचा आहे. या करारानुसार केली जाणारी वृक्षलागवड ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये साकारणार वनराई, 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी appeared first on पुढारी.