नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ

कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या पोलिस कोठडीत विशेष पोक्सो न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर या आश्रमाच्या विश्वस्तांची चौकशी केली जात आहे.

द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने सहा मुलींचे लौंगिक शोषण केल्याचे गेल्या आठवड्यात उघडकीस आले. धर्मादायकडील नोंदणीकृत संस्थेच्या नावाखाली नियमांची पूर्तता न करता व शासकीय यंत्रणांची पूर्वपरवानगी न घेता सरसकट आश्रम सुरू केला. अल्पवयीन मुला-मुलींचा सांभाळ करण्याच्या बहाण्याने देणग्या गोळा करण्यासह अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे महिला व बालविकास मंत्र्यांसह महिला व बालविकास आयोगानेही या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. आश्रमात वॉर्डन म्हणून काम पाहणाऱ्या हर्षलच्या सासूचीही पोलिस चौकशी करीत आहे. तसेच पत्नीचाही जबाब पोलिसांनी घेतला आहे.

दरम्यान, संशयित हर्षल मोरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पोलिसांनी बुधवारी (दि.३०) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद करताना पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता असून, हर्षल याने इतर ठिकाणीही पीडितांवर अत्याचार केल्याचा संशय असून, तपासासाठी कोठडीची मुदत वाढवून मागितली. त्यानुसार न्यायालयाने हर्षल यास सहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यास इतर गुन्ह्यांमध्येही अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.