नाशिकरोड पोलिसांचा तळीरामांवर कारवाईचा दंडुका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशान करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या तळीरामांवर नाशिकरोड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून तळीरामांचा शोध घेतला. कर्तव्यदक्ष पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली.

याविषयी दै. ‘पुढारी’मध्ये सोमवारी (दि.22) ‘नाशिकच्या प्रवेशद्वारावर तळीरामांचा उपद्रव’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत पोलिस उपआयुक्त खरात यांनी नाशिकरोड पोलिसांना तळीरामांची धरपकड करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे सोमवारी व मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली. बागूलवाडी ते मालधक्का रेल्वे फाटक, बागूलवाडी ते पाटील नर्सरी या मार्गावर पोलिसांनी ही मोहीम राबवत तळीरामांचा बंदोबस्त केला. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी तसेच महत्त्वाच्या बाजारपेठा येथे उघड्यावर मद्यप्राशान करून उपद्रव निर्माण करणार्‍या तळीरामांवरही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत काही भागात उघड्यावर मद्यप्राशन करून उपद्रव निर्माण करण्याचे प्रकार वाढत होते. यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. तळीरामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. नाशिकरोड पोलिसांनी विशेष पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत तळीरामांचा बंदोबस्त केला.जोपर्यंत तळीरामांचा कायमचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांकडून समाधान व्यक्त
पोलिसांनी केलेल्या तळीरामांच्या धरपकडीमुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांची ही विशेष मोहीम जोपर्यंत तळीरामांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .

येथे झाली कारवाई
पोलिसांनी नाशिकरोडच्या पाटील नर्सरी, स्टेशन परिसर, पवारवाडी, रेल्वे मालधक्का, गुलाबवाडी, जैन बागूलवाडी या ठिकाणी कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिकरोड पोलिसांचा तळीरामांवर कारवाईचा दंडुका appeared first on पुढारी.