नाशिकवरून महायुतीतील जागा वाटपाचे घोडे अडले, भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही केला दावा

भुजबळ, गोडसे, शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटासह भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गटा) या तीनही घटक पक्षांनी दावा केला असून, कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नसल्यामुळे महायुतीतील जागा वाटप अडले आहे. शिंदे गटाने नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची जाहीर केलेली उमेदवारी भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही नाकारली असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम असल्याचे राष्ट्रवादी (अजित पवार गटा) नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यामुळे नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा (शिंदे गटा) मूळ दावा असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. एका राजकीय सर्वेक्षणाचा दाखला देत गोडसे हे निवडून येणारे उमेदवार नसल्याचा दावा करत भाजपने नाशिकवर हक्क सांगितला आहे, तर नाशिकची मूळ जागा आपलीच असल्याचे सांगत राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. महायुतीत हा संघर्ष सुरू असतानाच नाशिकमध्ये आयोजित शिंदे गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून थेट गोडसे यांची उमेदवारीच जाहीर करून टाकली. त्यामुळे महायुतीतील संघर्ष अधिकच टोकाला गेला. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी जाहीर करण्याच्या निर्णयाला आक्षेप घेत नाशिकची उमेदवारी दिल्लीतील नेतृत्वच जाहीर करेल असा दावा केला. त्यानंतर भुजबळ यांनीही श्रीकांत शिंदे यांच्या निर्णयाविरोधात टीका केली होती. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले होते. तुम्ही काही मतदारसंघात अघोषित उमेदवार जाहीर करतात, तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे जाते, अशा शब्दांत शिरसाट यांनी भुजबळ यांना सवाल केल्यानंतर महायुतीतील तणाव अधिकच वाढला. त्यानंतर रविवारी एका नियोजित कार्यक्रमात भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगत गोडसे यांच्या उमेदवारीचा निर्णय मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनीही प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. परिणामी, महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अडल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले भुजबळ?

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, नाशिकमध्ये आमच्या पक्षाचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ आम्हाला हवाच आहे. दिंडोरीत विद्यमान मंत्री आणि महिला उमेदवार असल्यामुळे आम्ही त्या जागेवरचा दावा सोडला. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघावरचा दावा आम्ही कायम ठेवला आहे, असे नमूद करत त्यांनी जाहीर झालेल्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकवरून महायुतीतील जागा वाटपाचे घोडे अडले, भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही केला दावा appeared first on पुढारी.