नाशिक : अतिरिक्त २०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी, मनपाचे जलसंपदाला पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदा पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने या महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात करण्याचे नियोजन होते. मात्र, निर्णय न होऊ शकल्याने पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जुलैऐवजी आता ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरिता महापालिकेने जलसंपदा विभागाला अतिरिक्त २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्र देण्यात आल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले.

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार यंदा नाशिककरांवर पाणीबाणीचा प्रसंग उद्भवू शकतो. अशात महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत आठवड्यातून एक दिवस म्हणजेच एकूण आठ दिवस, तर जून, जुलै महिन्यांत आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच १६ दिवस असे एकूण २४ दिवस पाणीकपात करण्याचा आराखडा शासनाला सादर केला होता. परंतु राजकीय पक्षांकडून विरोधाचा सूर उमटल्याने एप्रिलमध्येही पाणीकपातीचा निर्णय होऊ शकला नाही. शिवाय या महिनाअखेरपर्यंत निर्णय होईल, अशीही स्थिती नसल्याने आता मनपा प्रशासनाला जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणीकपातीचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरिता अतिरिक्त २०० दलघफू आरक्षणाची गरज भासणार असून, त्याबाबतची मागणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

पाण्याच्या नियोजनाबाबत राज्य शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांतील स्थितीचा आढावा घेताना पाणी बचतीच्या नियोजनाबाबत आदेश दिले होते. यावेळी शेतीचे आवर्तन कमी करता येईल काय? याचाही आढावा घेण्यात आला होता. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहातून महापालिकेचे ४२०० दलघफू, तर मुकणेमधून २२६० दलघफू आरक्षण शिल्लक आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास अतिरिक्त २०० दलघफू आरक्षणाची गरज भासू शकते. त्यामुळे महापालिकेने जलसंपदाकडे त्याबाबतची मागणी केली आहे.

१२ हजार ९२० दलघफू पाण्याची बचत
सद्यस्थितीत शहराला दररोज ५४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार मेमध्ये आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे महिन्यातून चार दिवस पाणीकपात केल्यास २,१४० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होईल. जून आणि जुलैत मात्र दोन दिवस पाणीकपातीचे नियोजन आहे. तसे झाल्यास या दोन महिन्यांत १६ दिवसांप्रमाणे ८,६४० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होईल. त्यानुसार जुलैपर्यंत जवळपास १२ हजार ९२० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल.

धरणातील आरक्षण
गंगापूर समूह – ४२०० दलघफू
दारणा – १०० दलघफू
मुकणे – १५०० दलघफू

धरणातील पाणीसाठा
गंगापूर – २७७३ दलघफू
कश्यपी – १४१४ दलघफू
गौतमी – ४२१ दलघफू
एकूण ४६०८ दलघफू (४९.५ टक्के)
मुकणे ४१८२ दलघफू (५८ टक्के)

हेही वाचा : 

The post नाशिक : अतिरिक्त २०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी, मनपाचे जलसंपदाला पत्र appeared first on पुढारी.