नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

येथे वसंतोत्सव बोहाड्यात सोंग घेतलेल्या पुरोहित कुटुंबाच्या बंगल्यात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करत रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असे मिळून साडेनऊ लाख रुपयांवर डल्ला मारला. बोहाड्याचा आनंद घेत असलेल्या कुटुंबाच्या बंगल्यातील चोरी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रवीण सांब देशमुख (वय 50) हे पुरोहित असून त्यांचा शांभवी बंगला हा गुरू गंगेश्वर धाममागे आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याने बोहाड्यामध्ये सोंग घेतले होते. त्र्यंबकेश्वरला बुधवारी रात्री वसंतोत्सवाचा अखेरचा दिवस होता. रात्री 9.15 च्या सुमारास बंगल्याला कुलुप लावून देशमुख परिवार कुशावर्त चौकात बोहाडा पाहण्यासाठी तसेच त्यात सोंग नाचविण्यासाठी गेले होते. बंगल्यात कोणीही नव्हते. रात्री 12 च्या सुमारास बंगल्यावर परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बंगल्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली 70 हजार रुपयांची रोकड, सोन्याचा पोहेहार, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे वेढे, ब्रेसलेट, सोन्यात मढवलेल्या रुद्राक्ष माळा, तीन नथी, चांदीची कुयरी व करंडे, कॅनॉन कंपनीचे दोन कॅमेरे, नेकलेस, दोन बांगड्या, चांदीची वाटी या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक यांना बोलावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस परिसरातून माहिती गोळा करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.