नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा

अनधिकृत धार्मिक स्थळांवर मनपाचा हातोडा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील अनधिकृत सर्वधर्मिय धार्मिकस्थळ हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली जाणार आहे. २०१९ मध्ये महापालिकेने सर्वेक्षण करीत तब्बल ६४७ अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी केली होती. त्यातील २४२ धार्मिकस्थळे नियमित केली होती, तर उर्वरित धार्मिक स्थळांबाबत हरकती, सूचना मागवून कारवाई केली होती. त्यावेळी हा वाद चांगलाच पेटला होता. काहींनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रमजान ईदनंतर अनधिकृत धार्मिकस्थळांचा मुद्दा हाती घेतला जाणार असल्याने वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने महापालिकेने २०१८-१९ मध्ये कारवाई सुरु केली होती. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने त्यानुसार धार्मिकस्थळांचे फेरसर्वेक्षण करून यादी प्रसिध्द केली होती. त्यात सहा विभागातील एकूण ८८९ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात प्राचीन २४२ धार्मिक स्थळे असल्याने ती नियमित करण्यात आली होती. तर काही धार्मिक स्थळे हटविण्यात आली होती. मात्र, जी स्थळे हटविली त्याठिकाणी पुन्हा एकदा धार्मिकस्थळे उभारण्यात आल्याने महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली आहे.

रमजान ईदनंतर शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळे हटविली जाणार आहेत. या स्थळांचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर कारवाईची प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता आहे. चालू एप्रिल महिन्याच्या अखेरीस रमजान ईद आणि अक्षयतृतीया असल्याने कारवाईसाठी मे महिन्याचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील दादर परिसरात समुद्रातील अनधिकृत मजारवरील कारवाईनंतर सर्वच धर्मियांच्या अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरातही अनधिकृत धार्मिकस्थळांची संख्या मोठी आहे. ही धार्मिकस्थळे हटविण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने यापूर्वी अनेकदा तयारी केली होती. पण कधी राजकीय दबाव तर कधी हा मुद्दा न्यायालयात नेणे, यामुळे य‍ा कारवाईस मुहूर्त लागला नाही. शिवाय हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून धार्मिक वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विभागनिहाय यादी तयार करणार

यंदा विभागनिहाय सर्व अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी तयार केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त व फौजफाटा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जाणार आहे. मे महिन्यात पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्याचे नियोजन अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरु केले आहे.

शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. मे महिन्यात ती हटविण्याची कारवाई हाती घेतली जाईल.
– करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग

हेही वाचा : 

The post नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा appeared first on पुढारी.