नाशिक : आज शब-ए-कद्र निमित्त मशिदींवर रोषणाई

मशिदींवर रोषणाई

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पवित्र रमजान पर्व सुरू असून, मंगळवारी (दि. १८) ‘शब-ए-कद्र’ साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार ‘शब-ए-कद्र’चे खूप महत्व आहे. यानिमित्ताने सर्व मशिदी, दर्गा व धार्मिक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी रात्री घरातच राहून इबादत करावी, असे आवाहन खतीब-ए-शहर हाफिज हिसमोद्दिन अशरफी यांनी केले आहे.

जुने नाशिकमधील चौक मंडई येथील जहांगीर मशिदीचे इमाम मौलाना मोहम्मद शरीफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शब-ए-कद्र निमित्त तराविहची नामानंतर बयान, हलका-ए-जिक्र, नात व मनकबत, सलातो सलाम व विशेष दुआ (प्रार्थना) चे आयोजन होणार आहे, अशी माहिती शौकत अली सय्यद यांनी दिली.

रमजानचे २६ रोजे पूर्ण होताच संध्याकाळी रोजा सोडताच शब-ए-कद्र ची सुरुवात होते. पवित्र कुराणमध्ये या रात्रीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले असून, पैगंबर साहेबांनीही शब-ए-कद्र संबंधी महत्त्व सांगितले आहे. ही रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक मौल्यवान असून, या रात्रीत अधिकाधिक इबादत करण्याची परंपरा आहे. याच रात्री पवित्र कुराण शरीफचा पहिला शब्द ‘इकरा’पासून धर्तीवर पैगंबर साहेबांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात झाली. या रात्री नमाज पठण, इबादत, कुराण पठणाला अधिक महत्त्व असते.

हेही वाचा : 

The post नाशिक : आज शब-ए-कद्र निमित्त मशिदींवर रोषणाई appeared first on पुढारी.