नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत

इंग्रजी शाळेत प्रवेश,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 30 जूनपर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे अर्ज करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे.

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, आदिवासी विकास भवन, जुना आग्रारोड, गडकरी चौक, नाशिक येथे पाल्याचा जन्म दाखला व पालकाचा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला शनिवार (दि. २४) पर्यंत सादर केल्यानंतर प्रवेशाचा अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशाचा अर्ज परिपूर्ण भरून दि. 30 जूनपर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादर करावा लागणार आहे. आधारपात्र असलेल्या विद्यार्थ्यांचीच नोंद घेतली जाणार असल्याचे रहमान यांनी स्पष्ट केले.

अर्ज भरून दिल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जातील कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित पालक व पाल्यांना कधी व कुठे उपस्थित राहायचे, याबाबत सूचना नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर देण्यात येतील. त्याचप्रमाणे मंजूर लक्ष्यांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यांचे अर्ज त्या-त्या संबंधित प्रकल्प कार्यालयात स्वीकारले जातील, असेही प्रकल्प अधिकारी रहमान यांनी सांगितले.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाच्या नावे सक्षम अधिकऱ्याने अनुसूचित जमातीचा दाखला दिलेला असावा, विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करून दाखल्याची सत्यप्रत जोडावी, पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख इतकी असावी, प्रवेशित विद्यार्थ्याचे वय दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साइज फोटो, पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावे.

हेही वाचा :

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत appeared first on पुढारी.