नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत

आरटीई ची सोमवारी लॉटरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आरटीईअंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चितीसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा लागणार आहे. तसेच प्रवेश निश्चितीची पावती पडताळणी समितीकडून घेणे बंधनकारक असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

आरटीईनुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील 401 शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 4 हजार 854 जागांसाठी 21 हजार 923 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाइन लॉटरीत 4 हजार 750 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीतील पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत. त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रत, अलॉटमेंट लेटरची प्रत, हमीपत्रासह पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. दरम्यान, निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त होतील. मात्र, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
आरटीई निवड यादीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठविले जाणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत appeared first on पुढारी.